मुंबई, 18 जानेवारी: राज्याच्या 34 जिल्ह्यांतल्या 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल आता हाती येत आहेत. सकाळपासून मतमोजणी सुरू आहे आणि हाती आलेल्या कलानुसार, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना सर्वात जास्त यश मिळाल्याचं दिसून येत आहे. काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढल्या गेल्या, काही ठिकाणच्या पॅनेलमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार एकत्र होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास वर्षभराने झालेल्या या गाव पातळीवरच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मात्र मतदारांनी पानं पुसल्याचंच चित्र आहे.
हळूहळू निकालाचे कल स्पष्ट होत असताना शिवसेना आणि भाजपचं पारडं वर-खाली होताना दिसत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 1886 पंचायतींचे निकाल लागले आहेत आणि अनेक जागांवरचे कल निश्चित झाले आहेत. त्याप्रमाणे सर्वाधिक जागा भाजपच्या उमेदवारांना मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेनेला सर्वाधिक 381 जागा मिळाल्या आहेत, त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नंबर लावला आहे. मनसेला मात्र फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
तळागाळात, गावपातळीवर मनसेची संघटना कमी पडते, असं चित्र यातून दिसत आहे.
भाजप 390
शिवसेना 381
राष्ट्रवादी 283
काँग्रेस 262
मनसे 5
मनसेचे डोंबिवली शहर सचिव निलेश भोसले यांनी आपल्या स्वतःच्या गावी म्हणजे बुद्रुकवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर इथे ग्रामपंचायत निवडणुकीत मैदान गाजवले स्वतः सह त्यांनी त्यांचे संपूर्ण पॅनल निवडून आणलं आहे.
कल्याणमध्ये गाजलेल्या खोणी ग्रामपंचायतीमध्ये भाजपला महाविकासआघाडीने जोरदार टक्कर दिली. तिथे मनसेही शर्यतीत होती. पण अखेर महाविकास आघाडीला सर्वाधिक 6 जागा मिळून त्यांचा विजय झाला.
राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.