महाराष्ट्राचा पारा वाढणार! जाणून घ्या किती असेल तापमान...

महाराष्ट्राचा पारा वाढणार! जाणून घ्या किती असेल तापमान...

तापमानाचा पारा कमाल 38 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : महाराष्ट्रातील वातावरणात उद्यापासून काहीसा बदल जाणवणार आहे. कारण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तापमानाचा पारा वाढणार आहे. तापमानाचा पारा कमाल 38 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मार्च महिना सुरू झाल्यानंतरही गेले काही दिवस राज्यात अनेक भागात थंडी सारखे वातावरण होते. आता मात्र राज्यात येत्या आठवड्यात कमाल तापमानात वाढ होणार असल्याने पुन्हा मार्च हिटचा अनुभव मिळणार आहे.

दरम्यान, यंदा ऐन मार्च महिन्यातसुद्धा राज्यातील काही ठिकाणी गारव्याची स्थिती आहे. हवामान बदलामुळे आंब्याच्या पिकावर सुद्धा परिणाम झाला आहे. पुण्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत बदल होत आहे. पुणे शहराचं किमान तापमान हे सध्या 15 अंशाच्या खाली गेल्याचं पाहायला मिळालं होतं.

पुण्यापाठोपाठ मुंबईतही सध्या वातावरणात पहाटे आणि रात्रीच्या सुमारास गारवा जाणवत होता. मार्च महिना म्हटलं की घामाच्या धारा आणि प्रचंड उकाडा अशीच स्थिती मुंबईकर अनुभवतात. मात्र यंदा मार्च महिन्यात वेगळ्याच वातावरणाचा मुंबईकर अनुभव घेत आहेत. उत्तर भारतात अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर काही भागामध्ये तापमानाचा पारादेखील खाली गेला आहे.

महाराष्ट्रात देखील मार्चच्या सुरुवातीला काही भागांमध्ये गारांसह पाऊस पडला होता. असा अचानक वातावरणात बदल झाल्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरात मार्च महिन्यात उकाड्याचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना मात्र सध्या सकाळी आणि संध्याकाळी हवेत गारवा जाणवू लागला आहे.

गेल्या दहा वर्षात प्रथमच मार्च महिन्यात मुंबईतील कमाल पारा 30 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला होता. मुंबईत दहा वर्षांपूर्वी रेकॉर्ड तापमान पाहिले तर कमाल तापमान 2018 साली 41 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. त्यानंतर 2019, 2015, 2013 वर्षी 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाल्याचे दिसून येते.

First published: March 15, 2020, 10:20 PM IST

ताज्या बातम्या