दिवसा घामाच्या धारा; संध्याकाळी वादळी पावसाच्या... आणखी किती दिवस राहणार असं हवामान?

दिवसा घामाच्या धारा; संध्याकाळी वादळी पावसाच्या... आणखी किती दिवस राहणार असं हवामान?

सध्याचा पाऊस हा अचानक सुरू होणारा आणि कमी वेळात धुवांधार बरसणारा पाऊस आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊनच गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा.

  • Share this:

मुंबई, 9 ऑक्टोबर : दिवसा हवेत असलेल्या कमालीच्या आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहतात, तर संध्याकाळी आभाळ भरून येऊन वादळी पावसाच्या धारा भिजवतात, असं विचित्र हवामान राज्याच्या बहुतेक भागांत सध्या जाणवत आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे आणि या विचित्र हवेपासून किमान आठवडाभर सुटका नाही, अशी चिन्हं आहेत. येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या सरी अशाच बरसत राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी संध्याकाळी पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यानं झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या. यात किमान तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे यांची पुण्यातली पहिलीच सभा या पावसामुळे रद्द करण्यात आली. स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 13 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

वाचा - मंदीचं अजब वास्तव! नॅनो 9 महिन्यात 1 तर मर्सिडीजची विक्री मात्र एका दिवसात 200

लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सावधान! विजांपासून सांभाळा

सध्याचा पाऊस हा अचानक सुरू होणारा आणि कमी वेळात धुवांधार बरसणारा पाऊस आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊनच गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा. वादळी वाऱ्यांसह पाऊस येत असल्याने झाडाखाली, मोडकळीला आलेल्या इमारतीखाली, पत्र्याच्या शेडखाली थांबायचं टाळा. शेतकऱ्यांनी विजांसह पाऊस असेल तर शेतात जाणं टाळावं. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, पत्र्याच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. हा वादळी पाऊस सहसा दुपारनंतर येतो आणि त्याचा अंदाज

मंगळवारी मुंबईसह उपनगरांला पावसाने झोडपून काढलं. ठाणे, डोंबिवली, भिवंडीत जोरदार पाऊस सुरू होता. डोंबिवलीमध्ये तर 4 तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा खंडीत झाला होता. ठाण्यात स्टेशनजवळ झाड कोसळून दोघं जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असून आता परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बुधवार आणि गुरुवारनंतर राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

वाचा - Amazon, Flipkartसह ई कॉमर्स कंपन्यांनी 6 दिवसांत विकलं 21 हजार कोटींचं सामान

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असल्यामुळे परतीच्या पावसालाही उशिर होत आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 9, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading