विधानसभेसाठी राज्यात काँग्रेसचा मास्टर प्लॅन, 'या' 3 नेत्यांना देणार मोठी जबाबदारी

पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर झालेला परिणाम आणि विधानसभेच्या दृष्टीने पक्षासमोरील आव्हानं, यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून कार्याध्यक्षांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 11:36 AM IST

विधानसभेसाठी राज्यात काँग्रेसचा मास्टर प्लॅन, 'या' 3 नेत्यांना देणार मोठी जबाबदारी

मुंबई, 4 जुलै : विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळावं, यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा पक्षानं स्वीकारला असून लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे. पण त्याचवेळी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तीन कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि के.सी. पाडवी या तिघांची कार्याध्यक्षपदी नेमणूक होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर झालेला परिणाम आणि विधानसभेच्या दृष्टीने पक्षासमोरील आव्हानं, यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून कार्याध्यक्षांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.

महाआघाडीची मोट बांधण्याचं आव्हान

स्वाभिमानी, आरपीआय (गवई गट) यांना सोबत ठेवण्याचं तर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला आघाडीत समाविष्ट करून घेण्यासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण या पक्षांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडी

Loading...

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेसाठी जागांचा फॉर्म्युला दिला आहे.'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचित आघाडीतर्फे अण्णाराव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'मिशन 49' ची घोषणा केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी 49 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. 'आघाडीबाबत अद्याप निर्णय झाला नसून पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आघाडीत जायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ,' अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. राजू शेट्टींच्या या नव्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे.

आरपीआय (गवई गट)

'विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सन्मानजनक वागणूक द्यावी. आम्हाला कमीत-कमी 10 जागा हव्या आहेत. या जागा न दिल्यास आम्ही 50 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू,' असा इशारा रिपाइंचे (गवई गट)नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीच्या अडचणींत भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...