मुंबई, 11 जुलै : लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी वंचित ही भाजपचीच बी टीम असल्याचा आरोप केला. 'न्यूज 18 लोकमत'ने आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना याबाबत प्रश्न विचारला.
वंचितच्या भूमिकेबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, 'मतांचं धृवीकरण होऊ नये असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळेच वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. प्रश्न A टीम किंवा B टीमचा नसून हा प्रकार वेगळाच आहे.'
'आम्ही चर्चेला तयार'
'विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. विषय जागांचा नसून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,' अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेसाठी जागांचा फॉर्म्युला दिला होता. 'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने घेतली. वंचित आघाडीतर्फे अण्णाराव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी ही भूमिका जाहीर केली होती.
VIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला