Home /News /maharashtra /

Explainer : महाराष्ट्र विधानसभेतलं Shakti Bill ज्यावर आधारित आहे तो दिशा कायदा काय आहे?

Explainer : महाराष्ट्र विधानसभेतलं Shakti Bill ज्यावर आधारित आहे तो दिशा कायदा काय आहे?

आंध्र प्रदेशातील 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर 'शक्ती' कायदा (Shakti Act) आणण्यासाठीचे विधेयक सादर केलं. यात बलात्कार, अ‍ॅसिड अटॅक आणि सोशल मीडियावर स्त्रियांविषयी अवमानकारक मजकूर टाकला तरी होऊ शकते जबर शिक्षा.

    अमरावती, 14 डिसेंबर : महिलांवर होणारे अत्याचार हा कायमच देशभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. हे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच नवा कायदा लागू करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आणि अल्पकालीन हिवाळी अधिवेशनाच्या  पहिल्याच दिवशी विधानसभेत (Maharashtra Assembly) शक्ती विधेयक (Shakti Bill) मांडण्यातही आलं. आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan mohan reddy) यांनी केलेला क्रांतिकारी 'दिशा कायदा' (disha act)डोळ्यासमोर ठेवत आपल्याकडे हा कायदा बनवला आणला जाईल. आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आंध्र प्रदेशातील 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर 'शक्ती' कायदा आणण्यासाठीचे विधेयक सादर केलं. यात बलात्कार, अ‍ॅसिड अटॅकआणि सोशल मीडियावर स्त्रियांविषयी अवमानकारक मजकूर टाकला तरी होऊ शकते जबर शिक्षा. महिलांवर अत्याचार करणाऱ्यास मृत्युदंडापासून ते 10 लाखांपर्यंतच्या दंडासारख्या कडक शिक्षांची तरतूद केली गेली आहे. 15 दिवसात चार्जशीट फाईल करून 30 दिवसांत खटला संपवण्याची तरतूद या कायद्यात असून देशमुख यांनी सादर केलेलं हे विधेयक  मंगळवारी सदनात मंजूर होणे अपेक्षित आहे. मात्र अत्याचाराच्या घटना घडण्याआधीच रोखल्या जाव्यात यासाठी आंध्र पोलिसांनी तयार केलेलं अत्याधुनिक अ‍ॅपसुद्धा महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार का हे पाहावे लागेल. नेमका कसा काम करतो 'दिशा' कायदा? मे 2019 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासूनच मुख्यमंत्री जगन मोहन यांनी महिला सुरक्षेला प्राधान्य दिलंय. त्यांनी केलेला 'दिशा' कायदा त्याचेच निदर्शक म्हणता येईल. कायदा अमलात आल्यापासून एकूण 390 केसेस त्याअंतर्गत रजिस्टर झाल्यात. या केसेसमध्ये केवळ 7 दिवसातच चार्जशीट फाईल करण्यात आल्या. पैकी 74 केसेसमध्ये अंतिम तपास होत न्यायही केला गेल्याचे अधिकारपदावरील व्यक्तींचे म्हणणे आहे. तीन प्रकरणांमध्ये मृत्युदंड दिला गेला. 5 प्रकरणात जन्मठेप तर 2 प्रकरणांमध्ये दोषींना 20 वर्षांची सजा सुनावली गेली. 5 प्रकरणांमध्ये दोषींना 10 वर्षांची तर 10 केसेसमध्ये सात वर्षांहून अधिक काळ कैद दिली गेली. आणि उरलेल्या केसेसमध्ये 5 वर्षांहून कमी शिक्षा दिली गेली आहे. पोलीस सेवा अ‍ॅप याशिवाय विशेष काय, तर नागरिकांना अत्याधुनिक सुरक्षा सुविधा देण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य पोलीसदल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आहे. 'एपी पोलीस सेवा' हे अ‍ॅप डाउनलोड करून कुणालाही आपण सध्या उभे आहोत ते ठिकाण सुरक्षित आहे किंवा नाही याची माहिती कळू शकते. वापरकर्त्याच्या जीपीएस लोकेशनद्वारे हे अ‍ॅप वापरकर्त्याची लोकेशन शोधत ती सुरक्षित आहे किंवा नाही ते सांगते. यासाठी पोलीस खात्यानं त्यांच्या डाटा बेसमधल्या, जिथे पूर्वी गुन्हे घडलेत अशा सर्व ठिकाणांचं 'जिओ टॅगिंग' केलंय. सोबतच, वापरकर्त्याकडे अ‍ॅप ओपन नसतानाही तो प्रवासादरम्यान ब्लॅक स्पॉट्स किंवा अपघातप्रवण भागांवर गेला तर लगेचच एक अलर्ट त्याला जातो. सुरवातीला तर राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या 'फेक न्यूज'ला आला घालण्यासाठी राज्य पोलिसांनी फॅक्ट-चेक कार्यक्रम राबवण्याचे ठरवलेय. आंध्र प्रदेश पोलिसांच्या टेक्निकल सर्विस डिपार्टमेंटनं डिजाईन केलेल्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे तब्बल ८६ प्रकारच्या सेवा दिल्या जात आहेत. या अ‍ॅपच्या निर्मितीबाबत डीआयजी पलराजू आयपीएस म्हणाले, "आमचे डीआयजी गौतम सवांग आयपीएस यांनी आम्हाला यंत्रणेला हवं तितकं तंत्रज्ञानयुक्त बनवण्याची मुभा दिलीय. त्यातून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचं लक्ष्य आमच्यासमोर आहे. हे अ‍ॅप लॉन्च झाल्यावर नागरिकांना पोलीस ठाण्यात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होतील. सोशल डिस्टंसिंगच्या काळात तर हे अ‍ॅप अजूनच मोलाचं झालंय. पडताळणीसाठी अर्ज करण्यापासून ते एनओसी मिळवणे आणि तक्रारींचे रियल टाईम  स्टेट्स जाणणे, पोलीस डिरेक्टरीतले क्रमांक शोधण्यापासून कायदेशीर आणि डिजिटल गोष्टींची माहिती मिळवण्यापर्यंतच्या सुविधा यामाध्यमातून नागरिकांना मिळतील. पोलीस यंत्रणेत क्रांतिकारी परिवर्तन घडवणाऱ्या या अ‍ॅपबद्दल नागरिकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आणू घातलेला कायदा आणि त्यातल्या तरतुदी कशा आणि किती प्रभावी असतील हे पाहता येईल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Women safety

    पुढील बातम्या