विकासकामांच्या नावानं बोंबाबोंब! भाजपच्या 'या' आमदाराला पुन्हा लॉटरी लागणार?

खडकवासला मतदारसंघाचं काय आहे समीकरण?

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 04:43 PM IST

विकासकामांच्या नावानं बोंबाबोंब! भाजपच्या 'या' आमदाराला पुन्हा लॉटरी लागणार?

अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 22 सप्टेंबर: बारामती लोकसभा मतदारसंघामधील एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणजे खडकवासला मतदारसंघ. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर शहरी भाग येत असल्याने गेली दोन टर्म इथून भाजपचाच आमदार निवडून येत आहे. यावेळीही पक्षात कोणी तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने भीमराव तापकिरांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

खडकवासला हा खरंतर मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा मतदारसंघ. पण त्यांचं अकाली निधन झाल्याने त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत गेल्या आणि ही जागा भाजपच्या ताब्यात गेली. इथून भाजपचे नगरसेवक भीमराव तापकिर आमदार झाले खरे पण विकास कामांच्या नावाने बोंब मात्र बोंब आहे. 2014 सालीही मोदी लाटेत त्यांना आमदारकीची लॉटरी लागून गेली पण त्यांना विकासकामं विचारली तर ते अजूनही नगरसेवक स्तरावरचीच विकासकामं सांगतात.

खडकवासला इथे खरंतर राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी आहे, पण पक्षाला गटबाजीचं ग्रहण लागल्याने तिथून भाजपचे भीमराव तापकिर अगदी विनासायास निवडून येत आहेत. यावेळी मात्र, राष्ट्रवादीच्या सचिन दोडके या युवकाने आमदारकीची बऱ्यापैकी तयारी केली आहे. मतदारसंघातील सर्वात गंभीर समस्या असलेल्या वाहतूक समस्येवर नदी पात्रातून रस्ता आणि मेट्रो नेण्याची संकल्पना ते मांडतात.

सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नदी पात्रात रस्ता तयार करण्याचा पालिकेचा प्रयत्न असला तरी पर्यावरण प्रेमी त्याला कडाडून विरोध करत आहेत.

खडकवासला मतदारसंघातील शहरी मतदारांची संख्या वाढल्याने तिथं गेली दोन टर्म भाजपचा आमदार निवडून येत आहे. पण त्याचा मतदारसंघाला म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. म्हणूनच स्वतःला सुज्ञ म्हणवणाऱ्या पुणेकरांनी यावेळी तरी आपला आमदार निवडताना जरा विकासकामांचा लेखाजोखाही घ्यावा, एवढीच काय ती माफक अपेक्षा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 10:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...