SPECIAL REPORT : भाजपच्या 'या' आरोपामुळे राज्यात नव्या राजकारणाचे चिन्ह?

SPECIAL REPORT : भाजपच्या 'या' आरोपामुळे राज्यात नव्या राजकारणाचे चिन्ह?

भाजप आणि शिवसेनेतला सत्तासंघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. भाजपनं कठोर भूमिका घेतल्यानं शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी

दिल्ली, 04 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेतला सत्तासंघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. भाजपनं कठोर भूमिका घेतल्यानं शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेत नाईलाजास्तव एकमेकांसोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या पदरात नेमकं काय पडणार हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल, असं मुख्यमंत्री ठामपणे सांगत असले तरी सत्तास्थापनेचा संघर्ष मात्र टोकाला पोहचला आहे. दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्यानंतर भाजपनं सेनेला शिंगावर घेण्याचं ठरवल्याचं दिसतंय.

शिवसेनेनं चर्चेची कवाडं बंद केल्यानं भाजपनंही ताठर भूमिका घेतली. जोपर्यंत सेना चर्चेची दारं किलकिली करत नाही, तोपर्यंत पुढाकार न घेण्याचं भाजपनं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सेनेची नजर गृह आणि नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांवर आहे. पण ते न देण्याची खूणगाठ भाजपनं बांधल्याचं समजतंय. तसंच अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सेना करत असली तरी मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चाच करायची नाही, यावर भाजप ठाम आहे.

सेनेच्या आक्रमक भूमिकेला शांत राहून उत्तर देण्याचं भाजपनं ठरवलंय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी टोकाची युती होणार नाही, याबद्दल भाजप नेत्यांना दांडगा विश्वास आहे.

इतकंच नाही तर सेनेमुळेच आपल्या 12 ते 15 जागा गेल्या, निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीला मदत केली, असा भाजपला संशय असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या सर्व संशयकल्लोळामुळे शपथविधीचा मुहूर्त जवळ येत असला तरी सेना-भाजपमधली चर्चेची कवाडं किलकिली व्हायला तयार नाहीत. फुटबॉलमध्ये तगडा स्पर्धक समोरच्याला पंचावर पंच मारण्याची संधी देतो आणि तो दमला की शेवटचा घाव घालतो, तशी भूमिका भाजपनं तर घेतली नाही ना, हे सेना आगामी काळात अजून किती पंच मारते, यावर ठरेल.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading