कोल्हापूर, 11 ऑक्टोबर : कोल्हापुरात लोकसभेच्या धर्तीवरच विधानसभेतही आमचं ठरलंय ही टॅगलाईन धुमाकूळ घालताना दिसत आहे. पण असं सोईच राजकारण करणाऱ्या शिवसेनेला चंद्रकांत पाटील भाजप मेळाव्यातूनच जाहीर इशारा दिला आहे. निमित्त अर्थातच दक्षिण कोल्हापूर लढतीचं आहे.
गेल्या लोकसभेत कोल्हापुरात या गाण्यानं चांगलाच धुमाकूल घातला होता. नव्हे आमचं ठरलंय याच टॅगलाईनच्या जोरावर शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार बनले अर्थात त्यासाठी त्यांना बंटी पाटलांनी छुपी मदत केल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. याच पराभवानंतर धनंजय अर्थात मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादीसोडून भाजपात डेरेदाखलही झाले आहे.
आताही विधानसभेच्या निमित्ताने बंटी पाटील आणि मुन्ना महाडिकचा गट पुन्हा आमनसामने आला आहे. भाजपतर्फे अमोल महाडिक तर काँग्रेसतर्फे ऋतूराज पाटील मैदानात आहेत. पण आता परतफेडीची वेळ आहे शिवसेनेच्या संजय मडलिंकावर...म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी आत्ताच मंडलिक गटाला इशारा देऊन टाकला आहे.
पण गंमत म्हणजे कोल्हापुरातलं हेच राजकीय साटंलोटं लोकसभेवेळी चंद्रकांत पाटलांना विनासायास चाललं होतं. कारण, त्यावेळी मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादीत होते. पण आता तेच मुन्ना महाडिक भाजपात डेरेदाखल झाल्याने चंद्रकांत पाटलांना बंटी पाटील आणि मंडलिक गटाची जवळीक डोळ्यात खुपू लागलीय कारण त्याचा थेट फटका अमोल महाडिक यांना बसू शकतो. आता बघुयात संजय मंडलिक आपलं ठरलंय म्हणत बंटी पाटलांच्या राजकीय मैत्रीला जागतात की गपगुमाने युतीचा धर्म पाळतात ते...?
=========================