SPECIAL REPORT : शरद पवार Vs फडणवीस 'पैलवान' लढाईचं 'हे' आहे वैशिष्ट्यं!

SPECIAL REPORT : शरद पवार Vs फडणवीस 'पैलवान' लढाईचं 'हे' आहे वैशिष्ट्यं!

यंदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या दोनच नेत्यांच्या खणाखणीनं गाजली. तसं पाहिलं तर एका नेत्याचा सांसदिय कारकिर्दीचा अनुभव तब्बल 52 वर्षांचा. तर दुसऱ्या नेत्याचं वयही तितकं नाही.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातच लढत झाली. शरद पवारांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संजीवनी मिळाली. मात्र 'मी पुन्हा येईन' असं आत्मविश्वासानं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काही जागा कमी झाल्या तरी स्पष्ट बहुमत मिळवून पवारांना मात दिली.

यंदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या दोनच नेत्यांच्या खणाखणीनं गाजली. तसं पाहिलं तर एका नेत्याचा सांसदिय कारकिर्दीचा अनुभव तब्बल 52 वर्षांचा. तर दुसऱ्या नेत्याचं वयही तितकं नाही. एकाच्या नावाचा राजकारणात दबदबा तर दुसऱ्यावर नवखेपणाचा शिक्का. शरद पवारांचं प्रभावक्षेत्र पूर्णपणे ग्रामीण महाराष्ट्र. तर देवेंद्र फडणवीस यांचा अवघा प्रवास शहरातून शहराकडचा. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून पुढे आलेले हे दोन्ही नेते चांगलेच तयारीचे निघाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते आमनेसामने आले आणि त्यांच्यात रंगली जोरदार राजकीय कुस्ती.

दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेली राजकीय कुस्ती सुरू असतानाच पावसातल्या सभेनं निवडणुकीचं चित्र बदललं. पाऊस आणि पवारांनी सत्ताधाऱ्यांचा उधळलेला वारू अडवला. मात्र, पवार मुख्यमंत्र्यांना सत्तेपासून रोखण्यात अपयशी ठरले. फडणवीस आणि पवार या लढतीत मुख्यमंत्र्यांची सरशी झाली हे वास्तव आहे.

निवडणुकीच्या प्रचारात मुख्मंत्र्यांनी दिलेला 'मी पुन्हा येईन' हा शब्द खरा करून दाखवला. हा शब्द खरं होण्यामागे अनेक कारणं होती. मागील पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारांची विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरले. झेडपी, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत फडणवीसांनी भाजपला नंबर वन केलं. पण हा यशाचा प्रवास खडतर होता.

शरद पवारांनी त्यांचं राजकीय कसब वापरून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. पवारांनी युतीच्या सरकारला पेशवाई संबोधलं. संभाजीराजे भोसलेंना राष्ट्रपती नियुक्त खासदार केले तेव्हा, पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात असा टोमणा पवारांनी मारला. नंतर पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडी घालण्याचं प्रकरण गाजलं.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा आशीर्वाद असल्याचीही जोरदार चर्चा झाली. मात्र, फडणवीसांनी मराठा आरक्षण देऊन पवारांच्या मुद्यातली हवा काढली. आणि त्यानंतर पवारांचा एकेक शिलेदार फितवण्याचा सपाटा लावला. शिवसेना महायुतीत कायम राहील याची काळजी घेतली. मित्रपक्षांना फुटू दिलं नाही. केंद्रीय नेतृत्चाचा विश्वास कायम ठेवण्यातही फडणवीस यशस्वी झाले.

फडणवीस चौफेर यश मिळवत असल्यानं अखेर पवार या वयातही त्वेषाने मैदानात उतरले. स्वपक्षाचा भरकटलेला तारू ठिकाणावर आणण्यासाठी पवारांनी जोर लावला. हा डॅमेज कंट्रोल करण्यात पवार नक्कीच यशस्वी झाले. राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 51 जागा मिळाल्या. परंतु, फडणवीसांच्या महायुतीला बहुमतापासून रोखण्यात त्यांना यश आलं नाही. हे निकालानं सिद्ध झालं.

मात्र फडणवीसांची पाच वर्षांची कामगिरी, स्वच्छ प्रतिमा आणि राजकीय डावपेच यांनी मतदारांवर प्रभाव टाकला. भाजपच्या पदरात मतदारांनी 106 जागांचं माप दिलं आणि पुन्हा युतीचं सरकार बनण्याचा मार्ग सुकर झाला. तर राजकीय कुस्तीनं फडणवीस आणि पवार हे दोन्ही पैलवान त्यांचे डाव टाकण्यात मातब्बर आहेत, हे ही जगानं पाहिलं.

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 10:00 PM IST

ताज्या बातम्या