जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती, 26 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षातच बसणार असल्याच्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. तर सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत 54 जागा जिंकल्यानं राज्यातलं राजकीय समीकरणच बदललंय. आत्मविश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाला आत्मविश्वास आला. अगदी सत्ता स्थापनेची चर्चाही सुरू झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधण्याचा पर्याय समोर येऊ लागला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गोविंदबागमध्ये शरद पवारांची भेट घेतल्यानं काही तरी शिजत असल्याचा वास अनेकांना आला. मात्र, शरद पवारांनी या सर्व चर्चा आणि पर्यायांना विराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं विरोधात बसण्याचं जमनत दिलंय, त्यामुळे आम्ही विरोधातच बसणार, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.
54 जागांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दंडात चांगलाच जोर आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. सत्ता स्थापनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणतीही भूमिका घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीत प्रचंड फरक आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्रित येणं शक्य नसल्याचं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडण्याची भूमिका घेतल्यानं युतीचं सरकार विनासायास सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झालं आहे.
=============================