SPECIAL REPORT: विधानसभेच्या आखाड्यात विखे विरुद्ध थोरात रंगणार लढत

SPECIAL REPORT: विधानसभेच्या आखाड्यात विखे विरुद्ध थोरात रंगणार लढत

विधानसभेसाठी शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसकडून सुरेश थोरात यांना उमेदवारी.

  • Share this:

हरीष दिमोटे (प्रतिनिधी) शिर्डी, 05 ऑक्टोबर: शिर्डी विधानसभा मतदारसंघात अखेर विखे विरूद्ध थोरात अशीच लढत होणार आहे. राधाकृष्ण विखेंना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आपला चुलत भाऊ सुरेश थोरात याला विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं आहे. त्यामुळे शिर्डीची लढाई रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.

शिर्डी मतदारसंघात विखें भाजपच्या तिकीटावर फॉर्म भरायला निघाले तरी त्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे नेमकं कोण लढणार हे निश्चित होत नव्हतं. आधी सत्यजीत तांबे नंतर सुधीर तांबे अशी नावं चर्चेत आली. पण थोरातांनी ऐनवेळी आपल्या चुलतभावालाच विखेंच्या विरोधात मैदानात उतरवलं. शिर्डीमधून काँग्रेसच्या तिकिटावर आता सुरेश थोरात विधानसभा लढणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना स्वतः बाळासाहेब थोरात जातीने हजर होते.

थोरातांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणी आश्वी गटातील 28 गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ आहेत त्यामुळे त्या 28 गावातील माजी पंचायत समिती सदस्य सुरेश थोरात यांनाच बाळासाहेबांनी विखेंच्या समोर उभे केले आहे. सुरेश थोरात यांच्या पत्नी देखील झेडपी सदस्य राहिल्या आहेत. पण केवळ 28 गावांच्या मतांवर थोरात विखेंना खरंच शह देऊ शकतील का हेच पाहायचं आहे कारण 2014 साली हेच विखे सर्वाधिक मत्ताधिक्याने शिर्डीतून विजयी झाले आणि विरोधी पक्षनेते बनले. पण लोकसभेत राष्ट्रवादीने सुजय विखेंसाठी नगरची जागा सोडायला नकार दिला अर्थात यासंघर्षातही थोरात हे पवारांच्याच बाजुने उभारल्याने सरतेशेवटी विखे भाजपात डेरेदाखल झाले. तर इकडे काँग्रेसमध्ये थोरात थेट प्रदेशाध्यक्ष बनले. त्यामुळे नगर जिल्ह्यातला हा विखे-थोरांतांचा राजकीय संघर्ष शिर्डीतही नव्याने बघायला मिळणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading