बालाजी निरफळ, प्रतिनिधी
उस्मानाबाद, 16 ऑक्टोबर : शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. पोटावरचा वार हातावर झेलल्यानं ओमराजे किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोर अजिंक्य टेकाळेला अटक केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नायगाव पाडोळी गावात ही घटना घडली.
निवडणूक जवळ आलेली असल्यानं खासदार ओमराजे निंबाळकर जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ओमराजे नायगाव पाडोळी गावात आले. ओमराजे सभेच्या ठिकाणाकडे निघाले. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांना त्यांनी नमस्कार केला. त्याचवेळी हस्तांदोलन करताना ओमराजेंवर चाकू हल्ला झाला. चाकू हल्ला करून आरोपी अजिंक्य टेकाळे फरार झाला. शिवसैनिकांनी त्याचा पाठलाग केला. अजिंक्य घरात लपला. त्याच्या घरापर्यंत शिवसैनिक पोहोचले. संतप्त शिवसैनिकांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
ओमराजेंवर ज्या चाकूनं हल्ला करण्यात आला तो चाकू घटनास्थळावर पडला होता. ओमराजेंनी त्यांच्यावरचा वार हातवर झेलला. चाकूचा वार त्यांच्या हातावर आणि घड्याळावर झाला. यामुळे चाकू वाकडा झाला.
दरम्यान, ओमराजेंनी भाजपविरोधी वक्तव्य केल्यानं टेकाळेनं आक्रमक पाऊल उचलल्याची गावात चर्चा आहे. अजिंक्य टेकाळे हा भांडखोर असून त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचंही गावकरी सांगतात.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत हा हल्ला झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली. राजकीय वाद या हल्ल्यामागचं कारण आहे का? हे आता पोलीस तपासात स्पष्ट होईल.
=============================