मुंबई, 17 ऑक्टोबर : राज्यात निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलंय. या तापलेल्या वातावरणात न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची मुलाखत घेऊन राजकीय भूकंप घडवला. या मुलाखतीत मुख्यमंत्री राष्ट्रवादीवर निशाणा साधत होते, तर पवारांवर बॅकफूटवर जाण्याची वेळ आली.
निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेऊन राजकीय खळबळ उडवून दिली. या मुलाखतीत अनेक विषयांवर ज्वलंत चर्चा झाली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. आघाडीचा एकहाती प्रचार करणाऱ्या शरद पवारांनाच मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पवारांच्या पत्रामुळेच सहकारी संस्थांना कर्ज देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटामुळे राज्यात खळबळ उडाली. शरद पवारांनी त्यावर थेट उत्तर दिलं. जर मी पत्र दिलं असेल तर त्याची चौकशी व्हावी, असं आव्हान शरद पवारांनी दिलं. राज्य सहकारी बँकेच्या गाईडलाईन्सच्या आधारे काही संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा पवारांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला.
या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी प्रफुल्ल पटेल प्रकरणावरही भाष्य केलं. दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्चीसोबत प्रफुल्ल पटेलांनी व्यवहार केल्यानं ईडीनं पटेलांची चौकशी केली. हा ईडीनं देशद्रोह्यासोबत झालेल्या व्यवहाराची चौकशी करू नये का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
निवडणुकीच्या काळात प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली. चौकशीनंतर आरोपात काही तथ्य आढळणार नाही, अशा शब्दात त्यांनी पटेलांची पाठराखण केली.
न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीनं निवडणुकीच्या प्रचाराची दिशाच बदलून गेली. मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटांवर स्पष्टीकरण देण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे.
=========================