Elec-widget

छगन भुजबळांचे पाय आणखीन खोलात, सुधारित कलमांमुळे अडचणी वाढल्या

छगन भुजबळांचे पाय आणखीन खोलात, सुधारित कलमांमुळे अडचणी वाढल्या

850 कोटींच्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात, भुजबळांविरुद्ध आणखी दोन सुधारित कलमं वाढवली आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुन्हा अडचणीत आलेत. कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांविरोधात दोन सुधारित कलमं वाढवली आहेत. त्यात दोषी आढळल्यास भुजबळांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.नेत्यांच्या पक्षांतरांमुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खडतर प्रवास संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. एकीकडे शरद पवारांविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळही संकटात सापडले आहेत.

850 कोटींच्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात,  भुजबळांविरुद्ध आणखी दोन सुधारित कलमं वाढवली आहेत.  कलम 409 अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेचा अपहार पब्लिक सर्व्हंटने, सरकारी कर्मचाऱ्याने करणे हे कलम वाढवण्यात आलंय.  कलम 477 अ  फोर्जरी अर्थात खाडाखोड, खोटी हिशेब, दिशाभूल करून खोटे आर्थिक अहवाल सादर केले, हे  दुसरं कलम वाढवण्यात आलं. कलम 409 अंतर्गत दोषी ठरल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सुरुवातील एसीबीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण मग ईडीने हाती घेत तपास केला. त्यादरम्यान भुजबळांची तब्बल 200 कोटींची मालमत्ता जप्त केली. तपासादरम्यान भुजबळांविरुद्ध महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने सुधारित कलमे लावून हा खटला मजबूत करण्यात आलाय.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी नव्या कलमांचा ड्राफ विशेष कोर्टात सादर केला. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह 14 जणांची नावं आहेत.  यामध्ये भुजबळांचा मुलगा आमदार पंकज आणि पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांची नावं आहेत.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामादरम्यान पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांवरून, छगन भुजबळ 14 मार्च 2016 पासून मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये होते. त्यांना हायकोर्टाने दोन वर्षांनी म्हणजे 4 मे 2018 रोजी जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयानं PMLA कायद्याचं 45 (1) हे कलम रद्द केल्यान, भुजबळांना जामीन मंजूर झाला होता. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 850 कोटी रुपयांचा फटका बसल्याचा आरोप आहे. निवडणुकीच्या काळात हा खटला कोणत्या वळणावर जातो, याकडे सगळयांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...