सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी
मुंबई, 27 मे: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द (SSC exam cancelled) करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचं मुल्यमापन कसं करणार? तसेच कशाप्रकारे गुण देण्यात येणार यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्याच दरम्यान आता दहावीच्या निकाला (SSC result) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दहावी बारावी निकालाच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत चर्चा झाली. दहावीचा निकाल लवकरच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर बारावीच्या निकाल प्रक्रियेबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कसे करण्यात येणार आणि त्यांना गुण कशा प्रकारे देण्यात येणार या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
SSC Exams: कोर्टानं फटकारल्यानंतरही परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटलं होतं की, तुम्हाल शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का? कोरोनाच्या नावाखाली दहावीची परीक्षा रद्द करुन तुम्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर बारावीची परीक्षा घेण्याचं म्हणत आहात, हा काय गोंधळ आहे? अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले होते.
जवळपास 14 लाख विद्यार्थी असलेल्या बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मग जवळपास 16 लाख विद्यार्थी असलेल्या दहावीची परीक्षा रद्द का केली? असा भेदभाव का? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.