मुंबई 11 जून : यावर्षी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा 10 वी निकाल कमी लागला त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली. यावर्षीच्या निकालात शाळांनी दिलेले अंतर्गत गुण ग्राह्य धरले नसल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलं. या निकालामुळे स्टेट बोर्डाचे विद्यार्थी मागे पडतील अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती. ही चिंता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी बोलणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केलं.
अकारावीच्या प्रवेशासाठी CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परिक्षेचेच गुण ग्राह्य धरले जावेत यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचंही तावडे यांनी जाहीर केलं. एकूण निकाल लावताना CBSE आणि ICSEच्या मुलांचे शाळांनी अंतर्गत परिक्षेत दिलेले काही गुण ग्राह्य धरले जातात. स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा नाही. त्यामुळे त्यांच्या निकालाची टक्केवारी एकदम खाली घसरली.
अंतर्गत गुणांमुळे निकालाची टक्केवारी वाढते. शाळा आपल्या मुलांना गुण देताना सढळ हाताने गुणे देतात त्यामुळे निकालांची टक्केवारी वाढते. हे गुण देतांना योग्य निकष लावले जात नाही असं आढळून आल्याने राज्य सरकारने ते गुण ग्राह्य धरणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र CBSE आणि ICSEच्या मुलांना मात्र हे गुण दिले जातात. त्यांचं बोर्ड वेगळं असल्याने त्यांना हा नियम लागू होत नाही. या निर्णयचा फटका बसल्याने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
निकालांच्या तीव्र स्पर्धेत स्टेट बोर्डाची मुलं मागे पडतील अशी चिंता सर्वच स्तरांमधून व्यक्त होत होती. पालक आणि विद्यार्थ्यांनीही तीव्र चिंता व्यक्त केली होती त्या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची विनंती केंद्राने मान्य केली तर 10वीच्या लाखो विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशासाठी मोठा फायदा मिळणार आहे.