जळगाव, 03 मार्च : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी दहावीचा भाषा (मराठी)विषयाचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. हा पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर आल्यानं खळबळ उडाली. या घटनेची तक्रार दाखल केली असता केंद्र प्रमुखांनी शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केलं आहे. तालुक्यातील एकाच केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट आहे. पहिल्याच दिवशी अशा प्रकारे कॉपी सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
राज्यातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. ही परीक्षा 03 मार्च ते 23 मार्चपर्यंत होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत होत आहेत. 9045 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मार्च 2020 पासून 80 गुणांची लेखी 20 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. 10 वीची परीक्षा देण्यासाठी गेल्यावर्षी पेक्षा यंदा 65 हजार 25 विद्यार्थी संख्या जास्त असल्याचंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे.
हे वाचा- SSC Sample Paper Hindi : हिंदीचा पेपर लिहिताना लक्षात ठेवा या गोष्टी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.