फडणवीसांचा हाच तो व्हिडिओ! शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी करत आहे दावा

फडणवीसांचा हाच तो व्हिडिओ!  शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी करत आहे दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला 50-50 फॉर्म्युल्याचे आश्वासन दिलं नसल्याचं म्हटल्यानंतर शिवसेनेनं एक व्हिडिओ माध्यमांसोबत शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पण सत्तेतील वाटा कुणाला किती यावरून युतीत संघर्ष सुरू झाला आहे. भाजप-सेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच होत असून शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहे. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 चे आश्वासन दिलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर शिवसेनेनं आजची बैठक रद्द केली आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ माध्यमांना पाठवला आहे.

युतीत सध्या खातेवाटपावरून तणाव वाढला आहे. एका बाजूने शिवसेनेचे नेते 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. तर दुसऱ्या बाजूने भाजपकडून मुख्यमंत्री आमचाच असं म्हटलं जात आहे. आता शिवसेनेच्या जनसंपर्क खात्याकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केलेल्या वक्तव्याची आठवण सेनेनं करून दिली आहे. शिवसेनेनं 50-50 फॉर्म्युल्याचा दावा केला असला तरी व्हिडिओत मात्र मुख्यमंत्री 50-50 वर काहीच बोलताना दिसत नाहीत. त्यांनी फक्त पद आणि जबाबदारी समान दिली जाईल असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदारऱ्या यांची समानता राखण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. एकूणच आमच्याकरता बाकी गोष्टी गौण असून यात काही अडचण आली तर उद्धवजी आणि अमित शहा हेच निर्णय घेतील. ते दोघेही सक्षम आहेत. ते दोघेही जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

सरकारमध्ये अर्धा वाटा मिळावा यासाठी सध्या सेनेकडून ठाम भूमिका घेतली जात आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सेना भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला 50-50 चे आश्वासन दिले नव्हते असं म्हटलं होतं. सेनेकडून सातत्यानं आधी ठरलं तेच झालं पाहिजे अशी मागणी होत असताना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. यातच आता 50-50 फॉर्म्युल्याबाबतची चर्चा दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ही चर्चा झाली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वाचा  : सत्तास्थापनेचा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार? नवं सरकार शहांच्या मुंबई दौऱ्यानंतरच

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्री असा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यावेळी कोणताही निर्णय माझ्यासमोर झाला नव्हता. जर त्याबद्दल अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असेल तर त्यावर तेच निर्णय़ घेतील. दुसरीकडे पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य करताना म्हटलं की, समान सत्ता वाटपाचा शब्द मुख्यमंत्र्यांनीच दिला. राऊत यांच्या वक्तव्याने युतीच्या नेत्यांमध्ये असलेला विसंवाद समोर आला आहे.

वाचा : निवडणुकीत 'लढणा'रे दोन नेते जेव्हा समोरासमोर येता तेव्हा...

एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेची चर्चा रंगली आहे. युतीचं सरकार येणार असलं तरी त्यातही सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं. तर लोकसभेत ठरल्याप्रमाणे युतीचा मार्ग निघाला नाही तर आम्ही वेगळ्या पर्यायांचा विचार करू असा इशारा आज संजय राऊत यांनी दिला.

वाचा : भाजप-शिवसेनेत मतभेद, सत्तावाटपाची पहिलीच बैठक रद्द

Published by: Suraj Yadav
First published: October 29, 2019, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading