..तर त्या बाटग्यांना जनता सोडणार नाही, सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा इशारा

भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेनं आम्हीही दारं, खिडक्या उघडी ठेवली असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 08:00 AM IST

..तर त्या बाटग्यांना जनता सोडणार नाही, सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा इशारा

मुंबई, 07 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भाजपकडून लवकरच गोड बातमी मिळेल असं सांगितलं जात असताना शिवसेनेनं मात्र, गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे? असं म्हणत गोड बातम्यांचे कितीही दाखले दिली तरी पाळणा हलणार का आणि तो कसा हलेल? असा प्रश्न विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर ठाम असल्याचंच सांगितलं आहे.

राज्यात महायुतीचं सरकार येईल असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडात साखर पडो. मात्र, प्रश्न असा आहे की, सरकार नक्की कधी येणार व महायुती ती कोणाची आणि कशी हे सांगितलं नाही असंही अग्रलेखात म्हटलं आहे. पुन्हा एकदा भाजप सरकार पुन्हा येणार नाही असं म्हणत मावळते मंत्री असा उल्लेख शिवसेनेनं केला आहे. राज्यात शिवसेनेचाच मुख्यंत्री व्हावा अशी मागणी जनतेतूनच होत असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

सत्तेच्या या संघर्षात घोडाबाजारही सुरु झाला आहे. असा घोडाबाजार करणाऱ्यांचाही अग्रलेखात समाचार घेतला आहे. ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी, हिंदुत्व वगैरे विचारधारेशी काडीचा संबंध नाही असे काही बाटगे नव्या आमदारांशी संपर्क करून थैलीची भाषा करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ही राजकीय झुंडशाही महाराष्ट्राच्या, शिवरायांच्या परंपरेस शोभणारी नाही असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. 'केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र' यावर अमित शहा यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआधी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असं म्हटलं. त्यावरून सेनेनं ही गोड बातमी कोणती? असा सवाल केला. सध्या महाराष्ट्रासाठी एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे.

शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर ठाम असून भाजपसोबत कोणतीच चर्चा करण्यास तयार नाही. यावरून भाजपने आम्ही चर्चेचा दरवाजा बंद केलेला नाही असं वारंवार म्हटलं. त्यावरही सेनेनं उत्तर देताना आम्हीही दरवाजे, खिडक्या उघड्याच ठेवल्या असून हवा खेळती ठेवली आहे. फक्त हवेसोबत कीटक आत येऊ नयेत याची खबरदारी घेतली आहे. सत्तेसाठी थैल्या ओतल्या जात आहेत पण शेतकऱ्यांच्या समस्येकडं लक्ष द्यायला वेळ नाही असंही सेनेनं म्हटलं. गुंडांचा धाक आणि पैशांच्या जोरावर कोणी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना तलवार घेऊन उभीच असल्याचा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला.

Loading...

दरम्यान, पुढचे मुख्यमंत्री हे आमचेच असतील असा दावा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. काहीही झालं तरी पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे. तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळपासूनच नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील गुरुवारी सकाळी राज्यपालांची भेट घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे असा विश्वास आहे की या बैठकीत भाजप सरकार बनवण्याचा दावा करेल.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 07:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...