सत्ता संघर्षाच्या 'हायव्हॉल्टेज ड्रामा'नंतर 3 मोठे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत

सत्ता संघर्षाच्या 'हायव्हॉल्टेज ड्रामा'नंतर 3 मोठे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत

तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर: राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षानं शनिवारी नवं वळण घेतलं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा दावा करत शपथविधी उरकला. अजित पवारांच्या शपथविधीबाबत आपण अनभिज्ञ असल्याची भूमिका शरद पवारांनी घेतली तर दुसरीकडे आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या संयुक्त याचिकेवर रविवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजही तीन प्रश्न अनुत्तरीतच राहतात. त्या तीन प्रश्नांची उत्तर राज्यातील जनेताला कधी मिळणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली खरी पण दोन्ही नेते एकत्र येऊन 30 नोव्हेंबरपूर्वी बहुमत सिद्ध करू शकणार आहेत का? जर बहुमत सिद्ध करू शकले तर ते कसं?सुरुवातीला अजित पवारांसोबत 11 आमदार होते. मात्र काही आमदारांनी त्यांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडे आता 105 आमदार आहेत तर 15 अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यांना अजून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 25 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. बहुमत खेचून आणण्यासाठी काय असेल मास्टर प्लॅन? याकडे सर्वांचं लक्ष आहेच परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.

वाचा-हा आमदार देखील पवार साहेबांसोबतच.. म्हणाले, 'मी अडकलोय, मला घ्यायला या'

रविवारी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

भाजपने अजित पवार यांच्यासह स्थापन केलेलं सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेनेनं आणि दोन्ही काँग्रेसनं केला. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे संयुक्तपणे दाखल केलेल्या या याचिकेवर रविवारी सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे. जनमताच्या बाजूनं कोर्ट निर्णय देईल असा विश्वास महाविकासआघाडीला आहे. त्यानंतर महाविकासआघाडी विधिमंडळ अध्यक्ष निव़डीसाठी निवडणूक घेण्याचा मानस असणार आहे. महाआघाडीच्या बाजूने कोर्ट निर्णय देणार का? य़ाकडेही सर्वांचं लक्ष आहे.

विधानभवनात भाजप आणि अजित पवारांच्या गटाला  बहुमत सिद्ध करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीदरम्यान शिवसेनेचे आमदार काँग्रेसची साथ देणार का? की शिवसेनेचे आमदार भाजपला गोपनीयता राखून आपलं मत देणार? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सत्ता संघर्ष अद्यापही कायम असला तरीही राजकारण एक वेगळं वळण घेत आहे. भाजपकडून आमदार फोडण्याचा प्लान आहे. तर महाविकासआघाडी एकजूट करून सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे राज्यातील या तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी 30 नोव्हेबंर अंतिम मुदत दिली आहे.

First published: November 24, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या