मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे (Shivsena) बरेच आमदार हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यायची शक्यता आहे. दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करू शकतात, यानंतर ते राजीनाम्याचं पत्र राजभवनला पाठवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्यामुळे राजभवनचं कार्यालय उद्धव ठाकरेंचा राजीनामा स्वीकारू शकते.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही महाविकासआघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास, विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे, पण संजय राऊत यांचं हे ट्वीट म्हणजे ठाकरे सरकार वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या गुवाहाटीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना घाबरवून पुन्हा परत आणण्यासाठी राऊत यांनी हे ट्वीट केलं का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजय राऊत विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं म्हणत असतील तरी राज्यपाल थेट ही भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकतात. जर भाजपने आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे सत्ता स्थापन करू शकत नाही, असं सांगितलं तर राज्यपाल घटनेच्या कलम 356 चा दाखला घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही शिफारस मान्य केली तर विधानसभा बरखास्त होईल.
विधानसभा बरखास्त झाली तर पुढच्या काही काळात राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, पण मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायची आमदारांची तयारी असेल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच कारणामुळे संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीचं ट्वीट करून आमदारांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
नितेश राणे यांची टीका
भाजप आमदार नितेश राणे यांनी याच मुद्द्यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना संविधान माहिती असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार ! असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.