मुंबई, 29 जून : महाराष्ट्रातल्या सत्तनाट्याचा (Maharashtra Politics) निकाल आज संध्याकाळी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवून ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जायला सांगितलं आहे, पण राज्यपालांच्या या आदेशाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.
एकीकडे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत औरंगाबादचं (Aurangabad) नामकरण संभाजीनगर (Sambhaji Nagar) करण्याचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे. कालच संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा प्रस्ताव ठेवला जाईल, असं सांगितलं होतं.
औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या या प्रस्तावावरून मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'राजीनाम्याची ‘ स्क्रीप्ट ‘ठरली. संभाजी नगरच्या नामांतराचा ‘आव आणायचा आणि आपले ‘हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे.. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना??' असं ट्वीट मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.
राजीनाम्याची ‘ स्क्रीप्ट ‘ठरली. संभाजी नगरच्या नामांतराचा ‘आव आणायचा आणि आपले ‘हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे.. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2022
राज्यामध्ये सत्तासंकट असताना औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाविकासआघाडीतले घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने याआधी अनेकवेळा औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता.
बहुमत चाचणीसाठी प्रत्येक मत गरजेचं असल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केला आणि त्यांच्या आमदाराला अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली आहे. विधानसभेमध्ये राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.