महाराष्ट्रावर अस्थिरतेची टांगती तलवार, राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होणार?

महाराष्ट्रावर अस्थिरतेची टांगती तलवार, राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होणार?

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि ती लागू झाल्यास राज्यातील सरकारचा कारभार कसा चालणार? जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटूनही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकलेला नाही. ‘जे ठरले तेच हवे’ ही शिवसेनेची भूमिका कायम असून, मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षांतील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे तूर्त तरी कठीण दिसत असल्याने दोन-तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ मानली जाते.

राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच आज सुटला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही सेना-भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली न झाल्याने सरकार कोण स्थापन करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर ठाम आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. यांच्यात तोडगा निघाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

भारताच्या राज्यघटनेत कलम 352 ते 360 ही आणीबाणीशी संबंधित आहेत. यामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. 1)राष्ट्रीय आणीबाणी, 2)आर्थिक आणीबाणी, 3) राष्ट्रपती राजवट.कलम 356 नुसार राज्यातील प्रशासन घटनेनुसार चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. तसेच ज्या राज्यातील सरकार केंद्राच्या आदेशांकडे दुर्लक्ष करते अशा ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतला जातो. तसेच राज्यपाल यासाठीचा अहवाल राष्ट्रपतींना सोपवतात आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात येते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्याला संसदेची मान्यता आवश्यक असते. त्यानंतर सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू करता येते. मात्र, संसदेनं पुन्हा पुढच्या सहा महिन्यांसाठी मान्यता दिली तर हा कालावधी वाढू शकतो. अशा पद्धतीने जास्ती जास्त तीन वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येते.

राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होणार?

राष्ट्रपती राजवट लागू झाल्या राज्याचा कारभार राष्ट्रपतींच्या हाती जातो. त्यांच्यामार्फत राज्यपाल हा कारभार बघतात. राज्य सरकार राष्ट्रपतींच्या मार्फत राज्यपाल चालवतात. राज्याच्या मुख्य सचिवांच्या मदतीनं हा राज्य कारभार चालवला जातो.

राज्यविधिमंडळाची कामे संसदेकडं सोपवली जातात. याशिवाय राष्ट्रपती कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कामे करून घेऊ शकतात. राज्याच्या निधीतून पैसे खर्च करण्याचा आदेशही राष्ट्रपती देऊ शकतात. तसेच या घोषणेची पुर्तता करण्यासाठी राष्ट्रपती प्रासंगिक व्यवस्था करू शकतात.

राष्ट्रपती राजवटीमध्ये राज्यातील सत्ता राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे असते. मात्र या काळात उच्च न्यायालयाची सत्ता ते कोणाकडेही देऊ शकत नाहीत. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकारही त्यांना असतो.

महाराष्ट्रात कधी लागली होती राष्ट्रपती राजवट ?

महाराष्ट्रात जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर ती पहिल्यांदाच नसेल. याआधी दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागली होती.

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

First Published: Nov 8, 2019 08:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading