महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, पुढच्या 36 तासात सरकार स्थापनेचा तिढा सुटणार?

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, पुढच्या 36 तासात सरकार स्थापनेचा तिढा सुटणार?

सत्ता स्थापनेसाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत वेगानं हालचाली सुरू, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून बैठकांचा सिलसिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: राज्यात सत्ता स्थापनेसाठी वेगान हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत एकमतानं काही अटींवर शिवसेनेला पाठिंबा देण्यावर एकमत झालं मात्र तरीही आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सकाळी 10 वाजता स्वतंत्र बैठक तर दुपारी 2 वाजता संयुक्त बैठक पार पडणार आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक बैठक झाली असून सेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत, असं स्पष्ट केलं आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात संपूर्ण चित्र उद्या (22 नोव्हेंबर)संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार असल्याचंही ते म्हणाले. लवकरच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं स्थिर सरकार येईल अशी काँग्रेसकडून सांगितलं जात आहे.

बुधवारी सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी येत्या 25 किंवा 26 नोव्हेंबरला शपथग्रहण समारंभ होऊ शकतो असा दावा केला होता. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. आमदारांना आपल्यासोबत पॅनकार्ड आणि पाच-सहा दिवसांच्या राहण्याच्या तयारीनं बोलावण्यात आल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे. तर शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे घोषणा करणार आहेत असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा मार्ग खरंच मोकाळ होणार की पुन्हा हा पेच कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे आज आणि उद्या घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष आहे.

दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत सोनिया गांधींनी शिवसेनेला काही अटी घातल्या आहेत. त्या अटी मान्य केल्या तरच काँग्रेस शिवसेनेला सरकार स्थापनेत पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना त्या अटी मान्य करणार का? की पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी नवी जुळवाजुळव करावी लागणार? हे चित्र पुढच्या 48 तासांत स्पष्ट होणार आहे.

First Published: Nov 21, 2019 07:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading