मुंबईच्या दादर पूर्व येथे असलेल्या आरए रेसिडेन्सी या 44 मजली इमारतीला आग लागली आहे, दाराची बेल वाजवल्यानंतर शॉर्टसर्किट झाला आणि त्यामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. बिल्डिंगच्या 42व्या मजल्याच्या घरात ही आग लागली आहे. रात्री साडेआठ वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली. दादर अग्निशमन केंद्र शेजारीच असल्याने ताबडतोब अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोहोचल्या. 42 व्या मजल्यावर आग लागली असल्याने संपूर्ण 42 मजले चढून अग्निशमन दलाला वरती पोहोचावे लागलं आणि त्यानंतरच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आग लागून दोन तासाहून अधिक अवधी झाला आहे मात्र आग पूर्णपणे विझली नसून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.