मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाना पटोलेंनी गड राखला, पण राष्ट्रवादी ठरली किंगमेकर; भाजप तिसऱ्या स्थानावर!

नाना पटोलेंनी गड राखला, पण राष्ट्रवादी ठरली किंगमेकर; भाजप तिसऱ्या स्थानावर!

भंडारा जिल्हा परिषदमध्ये 52 पैकी 21 जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष जरी बनला असला तरी सत्तेपासून दूर आहे.

  नेहाल भुरे, प्रतिनिधी

  भंडारा, 19 जानेवारी : भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल (Bhandara Zilla Parishad Election Result) जाहीर झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी आपला गड पुन्हा एकदा कायम राखला आहे. काँग्रेसने सर्वाधिक 21 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  मागील निवडणुकीपेक्षा यावेळी 3 जागा काँग्रेसने जास्त जिंकल्या आहेत. तर, राष्ट्रवादी मात्र किंगमेकर ठरली आहे.  भाजपला 12 जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.

  भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत 52 जागांचे निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत नाना पटोले यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पण नाना पटोले यांनी सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. काँग्रेसने सर्वाधिक 21 जागेवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना, वंचित आणि बसपाला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावं लागलं आहे. अपक्ष उमेदवारांना 3 जागा मिळाल्या आहेत. नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता काँग्रेसला मिळवता आली नाही, पण सर्वाधिक जागा जिंकून गड कायम राखला आहे.

  भंडारा जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. पण या वेळी एक जागा कमी झाली आहे. राष्ट्रवादीने 15 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेना 01 जागा जिंकली होती. काँग्रेसनं सर्वाधिक 19 जागा जिंकल्या होत्या. या वेळी काँग्रेसच्या तीन जागा वाढल्या आहेत.

  पण, नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचा नैतिक पराभव झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदेत 52 पैकी 21 जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष जरी बनला असला, तरी सत्तेपासून दूर आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसची वाट खडतर केल्याचं पाहायला मिळालं.  राष्ट्रवादी काँग्रेसने 13 जागा मिळवत सत्तेची चावी आपल्या हाती ठेवली. जिल्ह्यातल्या तीन नगरपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी भाजपने  सत्ता मिळवली. एका ठिकाणी राष्ट्रवादीनं सत्ता मिळवली. 17 चं संख्याबळ असलेल्या मोहाडी व लाखांदूर नगरपंचायतीत 9 जागांवर विजय मिळवत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली. नाना पटोले यांच्या गृहनगर लाखनीमध्ये राष्ट्रवादी सत्तेजवळ पोहोचली. नाना पटोले यांनी आक्रमक भाषण देऊन प्रचार केला, मात्र मतदारांची मतं आपल्या बाजूनं वळवण्यात ते अपयशी ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी किल्ला लढवला, तर भाजपची धुरा आमदार परिणय फुके यांच्या खांद्यावर होती.

  First published:
  top videos