राज्यातील सत्ता निसटली पण भाजपमध्ये फडणवीसांचंच वर्चस्व, काय आहे नवा मास्टरस्ट्रोक?

राज्यातील सत्ता निसटली पण भाजपमध्ये फडणवीसांचंच वर्चस्व, काय आहे नवा मास्टरस्ट्रोक?

नव्या ओबीसी नेत्यांना संधी देत भाजप नेतृत्वाने जुन्या नेत्यांना बाजूला केल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 8 मे : विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानपरिषद उमेदवारीसाठी भाजपने डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांनी दुपारी 2 वाजता विधानभवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. मात्र या उमेदवार यादीनंतर आणखी एक मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. तो म्हणजे भाजपमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाचा.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून तीन ओबीसी आणि एक मराठा चेहरा मैदानात असल्याचं पाहायला मिळत आहे. डॉ. अजित गोपचडे आणि प्रवीण दटके ओबीसी, गोपीचंद पडळकर हे धनगर नेते तर रणजितसिंह मोहिते पाटील मराठा. या उमेदवारांच्या आधारे भाजपने जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. मात्र त्याचवेळी पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. नव्या ओबीसी नेत्यांना संधी देत भाजप नेतृत्वाने जुन्या नेत्यांना बाजूला केल्याचं पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीसांचं वर्चस्व

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपने ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लढली होती. त्यामुळे साहजिकच निवडणुकीतील प्रत्येक मोठ्या निर्णयाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी होती. त्याचवेळी दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा खडसे, तावडे, मुंडे आणि बावनकुळे यांना विधानपरिषद उमेदवारीपासूनही दूर ठेवल्याने पक्षात अजूनही फडणवीसांचं वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे विधानपरिषद उमेदवार आणि त्यांचा राजकीय प्रवास

प्रवीण दटके

विद्यमान नागपूर भाजप शहराध्यक्ष

नागपूरचे माजी महापौर

स्थायी समिती अध्यक्ष

युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष

चार वेळा नगरसेवक

गोपीचंद पडळकर

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली होती. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा होती. मात्र या निवडणुकीत पडक्र यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याकडून दारुण पराभव सहन करावा लागला. असं असलं तरीही धनगर समाजातील तरुण वर्गात गोपीचंद पडळकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि याच कारणामुळे भाजपने त्यांना विधानपरिषदेत संधी दिल्याचं बोललं जात आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील

विधानपरिषद सदस्य ( 2003-2009)

राज्यसभा सदस्य (2009ते 2012)

माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसहे

माजी चेअरमन सोलापूर जिल्हा सहकारी बँक.

माजी चेअरमन शिवामृत उत्पादक संघ.

सध्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन

रणजितसिंह मोहिते-पाटील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू, तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गावपातळीपर्यंत संघटन बांधण्यासाठी, वाढीसाठी प्रयत्न केले. विधानपरिषद व राज्यसभेवर अल्पकाळ काम करण्याची संधी मिळाली.

कशी मिळाली उमेदवारी?

मोहित पाटील कुटुंबीयांनी आपली ताकद दाखवत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणला. या बदल्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांना मंत्रिपद निश्‍चित होते. परंतु, बदलत्या राजकीय वातावरणामुळे त्यांना निवडणुकीनंतर एकही पद मिळाले नाही. मात्र आता भाजपने त्यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: May 8, 2020, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading