नाशिक, 5 एप्रिल : भाजप खासदार किरीट सौमय्या यांचं तिकीट कापण्यात शिवसेनेचा काही संबंध नाही. हा भाजपचा अंतर्गत निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपने तिकीट वाटपात किरीट सोमय्या यांना डावलण्यामागे शिवसेनेचा दबाब हे कारण असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याच चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे.
'किरीट सोमय्या यांनी प्रचार करू नये, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,' असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात सोमय्या किमान प्रचारासाठी तरी मैदानात उतरणार का, हे पाहावं लागेल.
किरीट सोमय्या आणि उमेदवारीचा वाद
शिवसैनिकांच्या कट्टर विरोधापुढे अखेर भाजपने नमत घेतं ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचा पत्ता कापला आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत ईशान्य-मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली.
भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता.
तसंच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' असा नाराही दिला होता. उमेदवारी मिळवण्यासाठी किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, 'मातोश्री'वरुन सोमय्या यांची भेट नाकारली. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती पण कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर भाजपने युतीचा धर्म पाळत किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारली.
त्यामुळे भाजपकडून 16 वी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक शिवसैनिकांनीही मनोज कोटक यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत भाजपने एकूण 7 विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आहे.
VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...