लोकसभा निवडणूक : दुहेरी धक्क्यानंतर राणे कोकणात पुन्हा वर्चस्व मिळवणार?

लोकसभा निवडणूक : दुहेरी धक्क्यानंतर राणे कोकणात पुन्हा वर्चस्व मिळवणार?

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 15 मे : महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचेच वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

शिवसेना युतीत येताच राणे भाजपपासून दूर

मधल्या काळात शिवसेना सतत सत्तेविरोधात भूमिका घेत होती. अशातच भाजपनं कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंना जवळ केलं. पण नंतर मात्र लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं.

राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक

कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांच्याकडे विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्याचं स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.

मागच्या दोन निवडणुकांत काय झालं?

2009 मध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यावेळी निलेश राणे हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये विनायक राऊत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. यावेळी निलेश राणे दुसऱ्या क्रमांकावर होते.

विनायक राऊत - आधी आमदार, मग खासदार

शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि आताचे इथले उमेदवार विनायक राऊत मुंबईत पार्ले विधानसभा मतदारंघातून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेतही काम केलं. मागच्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाले.

या लोकसभा मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ,सावंतवाडी, कणकवली हे सहा मतदारसंघ आहेत.

महिला मतदार जास्त

या लोकसभा मतदारसंघात 13 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यातही महिला मतदार 7 लाखांहून जास्त आहेत.

VIDEO : सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द, कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला चोप

First published: May 15, 2019, 4:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading