नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येणार?

नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येणार?

भाजप-शिवसेना युतीसमोर मागील लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचं मोठं आव्हान आहे.

  • Share this:

अहमदनगर, 13 मे : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान पार पडलं. त्यानंतर आता कुणाला किती जागा मिळणार, याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्राबाबतही अशीच चर्चा सुरू असून भाजप-शिवसेना युतीसमोर मागील लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचं मोठं आव्हान आहे.

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा असून त्यामध्ये नगर दक्षिण, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि रावेर या मतदारसंघांचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत युतीनं उत्तर महाराष्ट्रात एकहाती विजय मिळवत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सगळ्या जागा कायम राखणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण यंदा प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे.

विखे, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला

काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधातच रणशिंग फुंकलेलं पाहायला मिळालं. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपली ताकद युतीच्या बाजूने उभा केली होती.

नगरमध्ये मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. पण काँग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. त्यामुळे या दोन्ही जागा विखे पाटलांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.

दुसरीकडे, जळगावची जागा भाजपकडे खेचून आणणं गिरीश महाजनांसाठी तितकसं सोपं असणार नाही. कारण या मतदारसंघात भाजपला आपला उमेदवार बदलावा लागला. तसंच अंतर्गत वाद थेट हाणामारीपर्यंत गेल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे जळगावमध्ये गिरीश महाजनांसमोर विजयासाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या मतदारसंघात भाजपकडून उन्मेष पाटील मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी दंड थोपटले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक होतेय. ही निवडणूक फक्त उमेदवार निवडण्यासाठी होणार नाही. जळगाव जिल्ह्याचा भावी नेता कोण? हेही ठरवणारी आहे, हे निश्चित.

जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच वर्चस्व राहिलं आहे. सतीश पाटील, सुरेश जैन, मनीष जैन यांचा अपवाद वगळला तर खडसेंना जिल्हाभर विरोध करण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी खडसेंच्या गडाला अक्षरशः सुरुंग लावले. महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद या निवडणुकीत भाजपला न भूतो असं यश मिळवून दिलं. आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही नेते रिंगणात आहेत. रावेरचा गड खडसेंना राखायचा आहे तर गिरीश महाजन यांनी आपल्या उमेदवारसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

नाशिकमध्ये राज इफेक्ट दिसणार?

नाशिक मतदारसंघात शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने पुन्हा एकदा समीर भुजबळ यांच्यावर विश्वास दाखवला आहे. जेलवारीनंतर समीर भुजबळ यांच्या प्रतिमेला बसलेला धक्का आणि नाशिकमधील शिवसेनेचं मजबूत संघटन, यामुळे ही जागा राष्ट्रवादीसाठी सोपी असणार नाही. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारविरोधी भूमिका घेतल्यानंतर नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी समीर भुजबळ यांना मदत केली असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मनसे इफेक्ट दिसणार का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान धुळे, नंदुरबार आणि दिंडोरी मतदारसंघातही युती आणि आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावेळीची उत्तर महाराष्ट्रातील सर्वच लढती चुरशीच्या झाल्या आहेत.

VIDEO : कपड्यांच्या दुकानाला मोठी आग, परिसरातील लोकांमध्ये खळबळ

First published: May 13, 2019, 3:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading