बारामती, 12 एप्रिल : 'निवडणुका आल्या की विरोधक येतात, बारामतीत भाषणबाजी करतात. पण बारामतीच्या विकासाच्या पॅटर्नबाबत मी कुणालाही चॅलेंज करते,' असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
'विरोधक आमच्यावर टीका करतात आणि निघून जातात. पुन्हा पाच वर्षे ते फिरकतच नाहीत. नुसती भाषणं करणं फार सोप असतं. या भागात विविध विकास कामं केली आहेत. बारामतीबद्दल या सर्व नेत्यांना प्रेम होतं तर एकाने तरी बारामतीचा दुष्काळी दौरा केलाय का,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ आगामी पाच वर्षात टँकरमुक्त होण्यासाठी, तसंच भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असं आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
'नको त्या गोष्टींवर भाषणबाजी'
'लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. पण दुर्देवाने देशासह राज्यापुढील महत्वाच्या विषयांवर कोणतेच नेते बोलत नाहीत. टंचाई, बेरोजगारी, शेतकर्यांच्या पिकांना हमीभाव देण्याबाबत बोलण्याऐवजी नको त्याच गोष्टींवर राजकीय पक्ष भाषणबाजी करत आहेत,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
SPECIAL REPORT : मुलगा की पक्ष? विखेंनी निवडला हा मार्ग!