नगर आणि शिर्डीच्या निकालावर ठरणार विखेंचं राजकीय भवितव्य

नगर आणि शिर्डीच्या निकालावर ठरणार विखेंचं राजकीय भवितव्य

सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 11 मे : काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधातच रणशिंग फुंकलेलं पाहायला मिळालं. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपली ताकद युतीच्या बाजूने उभा केली होती.

नगरमध्ये मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. पण काँग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. त्यामुळे या दोन्ही जागा विखे पाटलांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.

जय-पराजयानंतर बदलू शकतात समीकरणं...

तिकीट न मिळाल्याने सुजय विखेंनी थेट पक्षांतर केलं. राधाकृष्ण विखे पाटीलही सातत्याने मुलाची पाठराखण करत राहिले. नंतर शरद पवार आणि विखे कुटुंबामध्ये असलेला जुना वादही पुन्हा उफाळून आला. मग पवारांनीही आपली पूर्ण ताकद लावत नगरमध्ये संग्राम जगताप यांच्या रूपाने सुजय विखेंविरोधात तगडा उमेदवार मैदानात उतरवला. त्यामुळे विखेंसाठी ही जागा आता प्रतिष्ठेची झाली आहे.

दुसरीकडे, शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखेंच्या समर्थकांनी थेट शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्हातील काँग्रेस नेते आणि विखेंचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरातांनी विखेंवर हल्लाबोल केला. थोरातांनीही शिर्डीची जागा काँग्रेसकडे खेचण्यासाठी मोठा जोर लावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याचं नेतृत्व कुणाकडे जाणार, या दृष्टीकोनातूनही या निकालाचं महत्त्व आहे. एकूणच शिर्डी मतदारसंघातील लढाईदेखील राधाकृष्ण विखेंसाठी 'करो या मरो'ची झाली आहे.

नगरसह शिर्डीमध्येही पक्षविरोधी भूमिका घेतली असताना विखेंनी अद्यापही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. पण विखेंच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेसनेही बाळासाहेब थोरातांना ताकद देण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डीतील सभेतनंतर थोरातांकडे केलेल्या मुक्कामाचीही जोरदार चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आगामी काळात तेही भाजपमध्ये सामील होतील, अशी शक्यता आहे. भाजपमध्ये त्यांना आपली स्पेस मिळवायची असेल तर शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघांचा निकाल हा विखेंच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांच्या निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

SPECIAL REPORT: मुंबईत 'वंचित'मुळे कोणाची उमेदवारी धोक्यात?

First published: May 11, 2019, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading