धक्क्यांच्या मालिकेत काँग्रेससाठी दिलासा, अब्दुल सत्तारांचं बंड थंड झाल्याची माहिती

धक्क्यांच्या मालिकेत काँग्रेससाठी दिलासा, अब्दुल सत्तारांचं बंड थंड झाल्याची माहिती

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 8 एप्रिल : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. तसंच त्यानंतर त्यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचंही जाहीर केलं होतं. पण आता अब्दुल सत्तार यांचं बंड शांत झालं असून ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करतील, अशी माहिती आहे.

भाजप प्रवेशाचीही होती चर्चा

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली होती.

वास्तविक सत्तार हे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण जागावाटपावेळी चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले.

राजीनामा देताना काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून वाद सुरु होता. झांबड यांना उमेदवारी मिळणार यावर नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

First published: April 8, 2019, 12:25 PM IST

ताज्या बातम्या