बारामती, 16 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी सुरुवात केली आहे. राज्यात राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा बारामतीवर लक्ष्य केंद्रित करण्याचं ठरवलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपनं बारामती मतदारसंघात मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या खासदार आणि बारामतीतील यावेळीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपनं कांचन कुल यांना उमेदवारी दिली. कुल यांच्या विजयासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभा घेतल्या. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे तर अनेक दिवस बारामतीतच तळ ठोकून होते. याच धर्तीवर भाजपने मिशन विधानसभेची तयारी सुरू केली आहे.
चंद्रकात पाटील बारामतीत पुन्हा तळ ठोकणार
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांना आव्हान देण्यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बारामतीत तळ ठोकणार आहेत. याआधी आम्ही बारामतीकडे संघटनाबांधणीकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं, पण आता त्यात सुधारणा करणार, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे आता भाजपने दिलेल्या या आव्हानाला अजित पवार कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, हे पाहावं लागेल.
VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!