औरंगाबाद, 4 मे : औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत सहकार्य केलं नाही, या खैरेंच्या आरोपामुळे आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.
औरंगाबादमधील या बैठकीला चंद्रकांत खैरे यांच्यासहित सर्व वरिष्ठ पदाधिकारी हजर आहेत. रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युतीचा प्रचार न करता त्यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी प्रचार केल्याचा आरोप खैरे यांच्याकडून याआधीच करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीनंतर चंद्रकांत खैरे काही मोठा निर्णय घेतात का, हे पाहावं लागेल.
काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला. दानवे यांनी निवडणुकीत आपल्याला मदत केली नाही असा आरोप त्यांनी केलाय. याची तक्रार भाजपच्या पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरेंना करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दानवेंनी युतीचा नाही तर जावई धर्म पाळला, अशी टीकाही त्यांनी केली.
औरंगाबादमधून खैरे सलग चार वेळा निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी असल्याचंही बोललं जातंय. खैरे म्हणाले, रावसाहेब दानवे यांनी जी मदत करायला पाहिजे ती मदत केली नाही. दानवेंनी युतीचा धर्म पाळला नाही असा आरोप त्यांनी केला. मला मदत न करता दानवेंनी त्यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठबळ दिलं असा आरोपही त्यांनी केला.
अमित शहांकडे तक्रार
भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दानवेंची तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं. दानवेंनी फक्त आठवडाभर आधी रॅली घेतली. उलट हर्षवर्धन जाधव यांनीच दानवे मदत करत असल्याचं पत्रकारांना सांगितलं होतं अशी आठवणही त्यांनी करून दिली.
तर भाजपचे नेते सुजीतसिंह ठाकूर यांनी खैरेंचे सर्व आरोप फेटाळून लावले. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दानवे यांनी खैरेंना मदत करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती त्यांनी दिली. दानवे हे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आजारी होते. ते त्यांच्या जालना मतदार संघातही प्रचारासाठी जाऊ शकले नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
VIDEO: रोजगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदींचं मौन का? राहुल गांधी