माढ्यात प्रतिष्ठेची लढाई, शेवटच्या दिवशी भाजपकडून 4 नेते प्रचाराच्या मैदानात

माढ्यात प्रतिष्ठेची लढाई, शेवटच्या दिवशी भाजपकडून 4 नेते प्रचाराच्या मैदानात

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघात भाजपच्या 4 हायप्रोफाईल नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

माढा, 21 एप्रिल : माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने आता चांगलीच कंबर कसली आहे. म्हणूनच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघात भाजपच्या 4 हायप्रोफाईल नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.

माढ्यात विजय खेचून आणण्यासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सांगोला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुर्डुवाडी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची माण खटाव आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची नातेपुते इथं सभा होणार आहे.

माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

शिंदे घराणं हे माढ्याच्या राजकारणात मोठं नाव राहिलं आहे. संजयमामा शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. त्यांना या पदासाठी भाजपने साथ दिली होती. भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून ते गेले काही दिवस लढत असले, तरी त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नव्हता. आता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली.

माढ्यातल्या मोहिते पाटील घराण्याशी शिंदेंचं कधीच जमलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे संजयमामा शिंदे हे धाकटे बंधू. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून त्यांनी भाजप पुरस्कृत युतीत सामील झाले होते. 2014 ची विधानसभा निवडणूक लढले ते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून. करमाळ्यातून लढत असताना त्यांचा पराभव झाला. माढ्यातून लोकसभा लढवणारा ताकदीचा उमेदवार म्हणूनच संजयमामांकडे भाजपनेही पाहिलं होतं. त्या वेळी शरद पवार स्वतः लोकसभेची निवडणूक माढ्यातून लढवणार अशी चर्चा होती. पण रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आणि माढ्याची गणितं बिघडली. शरद पवार यांनीसुद्धा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि तेव्हापासून माढ्याचा तिढा काही सुटता सुटत नव्हता.

भाजप आणि राष्ट्रावादी दोन्ही परस्परविरोधी पक्षांनी वेगवेगळ्या वेळी संजय शिंदेंवर विश्वास दाखवण्याची तयारी दाखवलेली होती, हीच संजयमामांची ताकद आहे, असं त्यांचे समर्थक सांगतात. ते इतर कुठल्या पक्षात फार रमले नाहीत. शिंदे हे मोहिते पाटील यांचे विरोधक तर अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. अंतर्गत राजकारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संजय शिंदेंना पाठिंबा देत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं. शिंदे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे माढ्याच्या राजकारणात आणखी चुरस वाढणार आहे.

SPECIAL REPORT: दुष्काळामुळे गावं पडली ओस, नेत्यांनी फिरवली पाठ

First published: April 21, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading