बारामती, 22 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील समारोपाच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अजित पवार यांनी यावेळी शिवतारेंना खुलं आव्हानच दिलं आहे.
'या निवडणुकीत प्रत्येकजण बारामतीत येवून आमच्यावर टीका करत आहे. आता विजय शिवतारेंनी फक्त आमदारच होवून दाखवावं. अख्या महाराष्ट्राला माहीत आहे की, मी एकदा ठरवलं तर त्या व्यक्तीला पाडतोच,' असं म्हणत अजित पवारांनी शिवसेनेच्या विजय शिवतारेंना आव्हान दिलं आहे.
मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत सभा घेणार होते. पण त्यांनी विचार केला असावा की, अजित पवारांच्या वेळी मी सभा घेतली तर ते लाखापेक्षा जास्त लीडने निवडून आले. म्हणूनच पंतप्रधानांनी आता बारामतीतील सभा रद्द केली असावी, असा हल्लाबोल अजित पवारांनी बारामतीतील सभेत केला आहे.
तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, नगरमधून सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे, रत्नागिरी सिंधूदुर्गातून निलेश राणे यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
VIDEO : चोर मचाये शोर, पोत्यात भरली चक्क बूट आणि चपला!