बारामती, 17 एप्रिल : माढ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींना उत्तर दिलं आहे. 'नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं? आता बोलायला मुद्देच नसल्यामुळे मोदी असं करत आहेत,' असा घणाघात अजित पवार यांनी केला.
'काँग्रेसने ज्याचं नाव मोदी आहे, त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. मी मागासवर्गीय असल्यामुळे मला अशी टीका सतत सहन करावी लागते. काँग्रेसने मला अनेकदा माझी जात सांगणाऱ्या शिव्या दिल्या आहेत,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील सभेत काँग्रेसवर टीका केली आहे. याद्वारे नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत पुन्हा एकदा जातीचं कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
'चौकीदार चोर है,' असं म्हणत राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार मोदींना लक्ष्य केलं आहे. पण मोदींनी या टीकेला आता थेट आपल्या जातीशी जोडल्याचं पाहायला मिळालं आहे.
मोदींची पवारांवर टीका
'शरद पवार यांना वाऱ्याची दिशा लक्षात आली. ते असं कधीच काही करत नाहीत, ज्यातून त्यांचं नुकसान होईल. वाऱ्याची दिशा बदलत असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली,' असं म्हणत माढ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या अकलूज इथं सभा सुरू आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचं आयोजन केलं आहे.
VIDEO : संविधान बदलण्याची इच्छा असल्याचा आरोप, पंकजा मुंंडेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर