माढा, 5 एप्रिल : 'मी तुमची राजकीय गुलामगिरीतून सुटका करायला आलो आहे,' असं आपल्या कार्यकर्त्यांना म्हणत माढ्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहिते-पाटील घराण्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. माढ्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवारांनी माळशिरस इथं सभा घेतली.
'मोदी विकासावर बोलण्याऐवजी पवार कुटुंबीयांबद्दल बोलतात. माझ्याकडून झालेल्या चुका ज्या मी मान्य करूनही वारंवार त्या पुन्हा पुन्हा काढल्या जातात. हे फक्त विषयांतरासाठी केलं जात आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
'धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं. पण प्रत्यक्षात काहीही झालं नाही. दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणणाऱ्या सरकारने नोकरी तर दिली नाहीच. पण तीन कोटी लोकांना बेरोजगार केले,' असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडला जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
माढ्यात प्रतिष्ठेची लढाई
माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले