माढा, 29 मार्च : राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. अशातच आता धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हेदेखील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धनगर समाजाचे नेते असलेल्या उत्तम जानकर यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य करणार, अशी भूमिका आता उत्तम जानकर यांनी घेतली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची चार लाख मते आहेत. त्यामुळे उत्तम जानकर निवडणुकीला उभे राहिल्यास नक्की कुणाला फटका बसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांना समाजाकडून निवडणूक लढण्याचा दबाव आहे, असं सांगण्यात येत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?
करमाळा
माढा
सांगोले
माळशिरस
फलटण
माण
माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा राष्ट्रवादीसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.
मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?
2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदानात होते.
कुणाला किती मते मिळाली?
शरद पवार - 530,596
सुभाष देशमुख - 216,137
महादेव जानकर - 98,946
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.
कुणाला किती मते मिळाली?
विजयसिंह मोहिते पाटील - 489,989
सदाभाऊ खोत - 464,645
प्रतापसिंह मोहिते पाटील - 25,187
मतदार संख्या आणि स्वरूप
या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या 17 लाख 27 हजार 322 एवढी होती. यातील 10 लाख 80 हजार 167 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
पुरूष मतदारांचं प्रमाण : 52.84 टक्के
स्त्री मतदारांचं प्रमाण : 47.16 टक्के
मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न
पाणी आणि रस्ते हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागाला कायमच दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. यंदाही हा भाग भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनावरे आणि शेतीसाठीच्या पाण्याशिवायच अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांची स्थितीही बिकट असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याच प्रश्नांवर रान पेटण्याची शक्यता आहे.
SPECIAL REPORT: मोहिते-पाटील आणि भाजपात नेमक काय चाललंय?