वैभव सोनवणे, 29 मार्च : पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. अशातच आता रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा आता काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत असून पुण्याची जागा राष्ट्रवादीला घेण्याबाबतच्या घडामोडींना वेग आला असल्याची माहिती आहे.
रावेर मतदारसंघाच्या बदल्यात काँग्रेसने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास राष्ट्रवादीकडून प्रविण गायकवाड यांना उमेदवारी दिली जाईल, असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
दरम्यान, पुण्यातल्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ अजुनही संपेलेला नाही. अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी नवेच नाव समोर आले. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. खुद्द रेखा पुणेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत त्यामुळे पुण्यात गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर यांच्यात सामना रंगणार अशीही शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत न्यूज18 लोकमतशी बोलताना सुरेखा पुणेकर यांनी खुलासा केलाय. त्या म्हणाल्या, दिल्लीत जाऊन मी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. ते मला कळवणार आहेत. पण मी कुणाला भेटले ते सांगणार नाही. काल पर्यंत काँग्रेसचे महापालिकेतले गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव निश्चित झालं अशी चर्चा होती.
VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..