पुणे, 29 मार्च : पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता याबाबत भाष्य केलं आहे. 'आघाडीच्या जागावाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे देण्यात आली आहे. त्यामुळे ती जागा आता त्यांच्याकडेच राहिल,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
'पुणे जिल्हातील अनेक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे जर पुण्याचीही जागा राष्ट्रवादीने घेतली, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायचा का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तो आम्हाला पटला. त्यामुळे ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला,' असं म्हणत अजित पवारांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा आता काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत असून पुण्याची जागा राष्ट्रवादीला घेण्याबाबतच्या घडामोडींना वेग आला असल्याची म्हणण्यात आलं होतं.
रावेर मतदारसंघाच्या बदल्यात काँग्रेसने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास राष्ट्रवादीकडून प्रविण गायकवाड यांना उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला. पण राष्ट्रवादीने आता ही शक्यता फेटाळून लावली आहे.
प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत प्रवीण गायकवाड हे काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे गायकवाड यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार का, याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
प्रवीण गायकवाड हे काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून लढतील हे चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. पण निवडणूक तोंडावर आली तरी काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे वैतागून अखेर आपण उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचं गायकवाड यांनी नुकतंच जाहीर केलं होतं.
पुण्यातल्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ अजुनही संपेलेला नाही. अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी नवेच नाव समोर आलं. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यताही समोर आली आहे. खुद्द रेखा पुणेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत त्यामुळे पुण्यात गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर यांच्यात सामना रंगणार अशीही शक्यता निर्माण झाली आहे.
VIDEO 'मुलासाठी मतं मागणार्या बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकवा'