Home /News /maharashtra /

ठाकरे-शिंदेंच्या लढाईत शिवसेनेला मोठा फटका, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची चांदी

ठाकरे-शिंदेंच्या लढाईत शिवसेनेला मोठा फटका, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची चांदी

राज्यातील सत्तांतराचा सर्वात मोठा फायदा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला झालेला नाही. तर भाजपला झाला आहे.

    मुंबई, 5 ऑगस्ट : राज्यातील विविध तालुक्यातील एकूण 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीसाठी काल (4 ऑगस्टला) मतदान पार पडलं होतं. ही निवडणूक राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता फार महत्त्वाची आहे. कारण राज्यात गेल्या महिन्यात सत्तापालट झालं. गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय वेगळ्या आणि कल्पनेच्या पलीकडे घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपचा हात धरला. या सगळ्या घडामोडींनंतर जनतेला नेमकं कुणाचं नेतृत्व हवं आहे, जनतेची यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे निवडणुकीशिवाय स्पष्ट होणार नव्हतं. या दरम्यान काल नियोजित 271 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. या मतदानाचे निकाल आता समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फायदा झाल्याचं चित्र आहे. भाजप या निवडणुकीत राज्यातील एक नंबरचा पक्ष ठरला आहे. तर मुख्य शिवसेनेची मोठी हानी झाल्याचं चित्र आहे. राज्यातील सत्तांतराचा सर्वात मोठा फायदा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला झालेला नाही. तर भाजपला झाला आहे. भाजप 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पहिला क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर शिंदे गट हा तिसरा आणि मुख्य शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेसची अवस्था खरंच बिकट आहे. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पाचव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ('काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकासआघाडीबद्दल बोलतही नाहीत', शिवसेनेची खदखद पहिल्यांदाच बाहेर) शिवसेना हा राज्यातील मोठा प्रादेशिक पक्ष आहे. पण एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाल्याने मुख्य शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. ते या निवडणुकीत स्पष्टपणे जाणवत आहे. ग्रामपंतायत निवडणुकीत शिंगे गट पुरस्कृत उमेदवारांना 40 ग्रामपंतायतींवर विजय मिळाला आहे. तर मुख्य शिवसेना पुरस्कृत उमेदवारांना 27 ग्रामपंतायतींवर  विजय मिळाला आहे. या दोघांची बेरीच केली तर दोन्ही शिवसेनेची मिळून एकूण 67 संख्या होते. हे दोन्ही गट एकत्र असते तर शिवसेना हा पक्ष राज्यात भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असता. विशेष म्हणजे भाजपच्या देखील वर्चस्वाला कदाचित धक्का बसू शकला असता. पण शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गट वेगवेगळे झाले. आणि त्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपला झाला. भाजपचा तब्बल 82 ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला. शिवसेनेच्या या फुटीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला देखील झाला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदावारांचा 53 ग्रामपंतायतीत विजय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. कोणत्या पक्षाच्या किती जागा विजयी? भाजप - 82 राष्ट्रवादी काँग्रेस - 53 शिंदे गट - 40 शिवसेना - 27 काँग्रेस - 22 इतर - 47
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या