पुणे, 09 जानेवारी : महाराष्ट्रात ६१ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारत यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. परंतु, हर्षवर्धन सदगीरला चांदीची गदा वगळता बक्षिसाची रक्कमच आतापर्यंत दिलीच नसल्याचं समोर आलं आहे.
07 जानेवारी रोजी नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरलं. परंतु, आयोजकांनी मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची चांदीची गदा वगळता कुठलेही रोख पारितोषिक मिळलेले नाही. इतर ही विजेत्यांना घोषित रोख रक्कमा मिळालेल्या नाही, अशी खंत अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केली.
यंदा झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ वजन गटात काका पवार यांचे शिष्य माती आणि गादी गटात सुवर्णपदक विजेते झाले तर महाराष्ट्र केसरीची गदा देखील काका पवार यांचा चेला हर्षवर्धन सदगीर याने पटकावली. यंदा ही स्पर्धा सिटी ग्रुप सारख्या मोठ्या उद्योग समूहाने प्रायोजित केली होती तसंच महाराष्ट्र केसरी विजेत्याला दीड लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
पुढील पाच वर्षांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात करण्याचा करार देखील सिटी ग्रुपने केला आहे. मात्र, विजेत्यासाठी घोषित रक्कम विजेत्यांना अद्याप मिळालेली नाही, असं काका पवार यांनी सांगितलं.
हर्षवर्धनला केवळ सुवर्ण पदक विजेत्यासाठीचे 20 हजार देण्यात आले. तर माती गटात सुवर्णपदक विजेता असलेल्या शैलेश शेळकेला मात्र अद्याप कुठंल ही रोख रक्कम मिळालेली नसल्याचे काका पवार म्हणाले.
मात्र, कुस्तीगिर परिषदेने अशी कुठलीही रक्कम घोषित केलेली ठरलं नसल्याचं म्हणत काका पवार यांचे आरोप खंडीत केले आहे.
'हर्षवर्धन सदगीर पुन्हा महाराष्ट्र केसरी खेळणार नाही'
दरम्यान, हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला पण इथेच न थांबता आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असं त्याने स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना हर्षवर्धनचे गुरू काकासाहेब पवार यांनी आता पुन्हा हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी खेळणार नाही अशी घोषणा केली.
केवळ महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कुस्ती पुढे न खेळता बाजूला जाणारे अनेक महाराष्ट्रकेसरी हलाखीच जीवन जगत असल्याचं धक्कादायक वास्तव ही काका पवार यांनी मांडलंय. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आणि सरकारने या खेळाडूंसाठी किमान नोकरीची व्यवस्था तरी करावी अशी विनंती करत कुस्तीसाठी हरियाणाच्या धर्तीवर धोरण राज्य सरकारने आणावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.