मुंबई, 8 डिसेंबर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जात असून या महाराष्ट्रदोह्यांविरोधात 17 डिसेंबरला न भूतो ना भविष्य हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आज महाविकास आघाडीचे सर्व घटक उपस्थित आहेत. गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग कारणीभूत आहेत. कर्नाटक निवडणूक समोर ठेऊन आता महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतं आहे. महाराष्ट्र प्रेमी आहेत त्या सर्वांना आम्हीं मोर्चासाठी बोलवलं आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते अशी उत्तरं देत आहेत. आमच्या संजय राऊत यांना उघड उघड धमक्या देत आहेत. कानडी गुंड धमक्या देत आहेत आम्ही शांत बसायचं? आम्ही नेहमी जनतेसोबत आहोत. नाणर येथील जनेतचा विरोध होता, आम्ही त्यांच्यासोबत होतो. वादग्रस्त प्रकल्प पाठवत आहेत. नानारबाबत प्रकल्प तिथ नको असं म्हणणं होतं. मात्र, दुसरीकडे करायला आमची अडचण नव्हती यावर त्यांनी बोलाव, असेही ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान : नाना पटोले
महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान सातत्यानं होत आहे. त्यामुळे आम्ही मोर्चा आयोजित केला आहे. राज्यातील सरकार बेळगाव प्रश्नावर बोलायला तयार नाही. महाराष्ट्रद्रोही सरकारचा विरोधात हा मोर्चा असणार आहे. राज्याचा हितासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्ला बोल या नावाने आंदोलन असणार आहेत.
फडणवीस धादांत खोटे बोलतायेत : अजित पवार
एकीकडे शांततेच आवाहन करतात आणि दुसरीकडे भडका उठेल अशा बाबी घडत आहेत. कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते हम करे सो कायदा असं वागत आहेत. वर्षानुवर्ष तिथली गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभेचे अध्यक्ष म्हणतात की हे दोन्ही राज्यांनी प्रश्न सोडवावा. मात्र, हे शक्य नाही. केंद्राने हा प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही हल्लाबोल आंदोलन पुकरालं आहे. आमच्या कार्यकाळात कधीच सीमा भागाचा विषय आला नाही. आता ही भावना त्या लोकांच्या मनात निर्माण होण्याला हे सरकार जबाबदार आहेत. हे कमी पडले आहेत. हे मान्य करत नाहीत. हिमाचल प्रदेश नड्डा यांचं राज्य आहे ते त्यांना टिकवता आलं नाही. याचा कमीपणा वाटत नाही का? सरकारी नोकरदार यांच्या पगारासाठी कर्नाटक बँकेचे नाव देण्यात आले आहे. आम्ही त्याला परवानगी दिली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले हे धांदात खोटं आहे. माझी माहिती आहे ही फाईल एका दिवसात क्लिअर झाली आहे. कर्नाटक बँकेचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांनी असं खोटं बोलणं योग्य नाही. एका दिवसात फाईल कोणी फिरवली याची माहिती आम्ही आरटीआयच्या माध्यमातून मागणार आहे.
महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला विराट मोर्चा
राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले व अन्य महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधाने, सीमाप्रश्नी इतर राज्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांच्या कटकारस्थानास राज्य सरकारची फूस असणे. सत्ताधारी नेत्यांची महिला व अन्य नेत्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये तसेच महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेऊन राज्यातील तरुणांची फसवणूक केल्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का सागला असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून त्याविरोधात आता येत्या 17 डिसेंबर रोजी भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis