मुंबई, 13 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चहुबाजूने अडचण झाली आहे. कारण मुंबईतील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर आणि स्वत: धनंजय मुंडे यांनी आपले दुसऱ्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचं मान्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवून ठेवल्याचा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी जाते की काय, अशीही शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अशाही स्थितीत मुंडे यांच्या समर्थनासाठी एक वेगळीच संघटना मैदानात उतरली आहे.
'द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडेंच्या प्रकरणात लागू होऊ शकत नाही. मुस्लीम 4-4 लग्न करतात, तर एखाद्या हिंदूने दुसरं लग्न केलं म्हणून काय फरक पडतो,' असं म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे पदाधिकारी अजय सिंह सेंगर यांनी धनंजय मुंडे यांचं जोरदार समर्थन केलं आहे. सर्व धर्मांना विवाहाचे वेगवेगळे निर्बंध असू शकत नाहीत. फक्त हिंदू धर्मालाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही, असं करणी सेनेच्या सेंगर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. गेंड्याच्या कातडीचे महाविकास आघाडीचे मंत्री राजीनामा देतील असं वाटत नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.