मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव, आता पुन्हा लॉकडाऊन? राजेश टोपे म्हणतात....

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव, आता पुन्हा लॉकडाऊन? राजेश टोपे म्हणतात....

कर्नाटकात ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी उत्तर दिलं.

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 2 डिसेंबर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) शेजारील कर्नाटक (Karnataka) राज्यात कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकात दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचीदेखील चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या 9 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे इतर काही नातेवाईक असे एकूण 28 जणांचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. या दरम्यान कर्नाटकात ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी उत्तर दिलं.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

"आपल्या देशात कर्नाटकमध्ये ओमायक्रोनाबाधित रुग्ण सापडल्याने केंद्र सरकारला नवे काही निर्बंध लावण्यात येतील का? याबाबत मी विचारणा केली. त्यावर त्यांनी सध्या दोनच रुग्ण सापडल्याने आज कुठलेही नवे निर्बंध लावण्याची आवश्यकता सध्यातरी वाटत नाही. पुढे आपण परिस्थिती बघुया, अशा स्वरुपाची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलीय. तसेच हा केंद्र सरकारच्या अखत्यारितला विषय आहे. त्यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्रात काय निर्बंध लावायचे किंवा कशा पद्धतीने पुढे जायचं या संदर्भात केंद्राशी विचार विनीमय करुन आम्ही पुढची व्हिव्यूरचना ठरवू", अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा : भारतात ओमायक्रोनचा शिरकाव, महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दोन रुग्ण

'ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर जवळपास 375 हायरिस्कर कॉन्टॅक्ट टेस्ट'

"कर्नाटकमध्ये ओमायक्रोन विषाणूने बाधित असलेले दोन रुग्ण आढळले आहेत. केंद्राचे आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी सविस्तर बोललो. त्यातून कर्नाटकात आढळलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या नंतर कर्नाटक सरकारने त्या बाधितांचे हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांची टेस्ट केली. विशेष म्हणजे एका रुग्णाचे तब्बल 200 हायरिस्क कॉन्टॅक्ट तपासले गेले आहेत. त्यांना आयसोलेट करण्यात आलं. त्यांच्यापैकी कुणीही कोरोना पॉझिटिव्ह सापडलेलं नाही. तर दुसऱ्या रुग्णाचे 175 हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट तपासले गेले. त्यापैकी 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे नमून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी कर्नाटकात परिस्थिती आहे", अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

"कोरोना प्रतिबंधक लस आपल्याला ओमायक्रोनपासून वाचवू शकेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे सर्वांनी लस घेऊन स्वत:ला आणि इतरांना सुरक्षित करावं, अशी माझी नम्रतेची विनंती आहे", असंदेखील राजेश टोपे यावेळी म्हणाले.

First published: