कोल्हापूर, 18 जानेवारी : राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीला (grampanchayat election 2021) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्या असून शिवसेना (Shivsena) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक अनेक ठिकाणी बिनविरोध झाली आहे. त्याची आकडेवारी आता समोर आली आहे. जवळपास 1410 जागा या बिनविरोध झाल्या. यात स्थानिक पातळीवर आघाड्यांकडे सर्वाधिक 525 जागा आहे. तर राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक 278 जागा आहे. सेनेनं भाजपला मागे टाकत मोठ्या भावाचा मान पटकावला आहे. भाजपने 259 जागा पटकावल्या आहे. तर राष्ट्रवादीने 218 जागा पटकावल्या आहे. काँग्रेसने 125 जागा जिंकल्या आहे. तर मनसेला सुद्धा खाते उघडता आले आहे. मनसेनं 5 ठिकाणी आपला बिनविरोध झेंडा फडकावला आहे.
राज्यातील सत्तेचं समिकरण पाहता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सर्वाधिक ठिकाणी बिनविरोध निवडून आले आहे. भाजपला इथे मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निकालाचे कल हाती यायला लागले आहे. सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींमधील 123 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर 98 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे 652 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले असून 9521उमेदवार रिंगणात उतरले होते. आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अशातच पहिला निकाल हाती आला असून कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी झालं आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा 8-1 ने धुव्वा उडवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातून पहिली गुड न्यूज आल्याचं दिसत आहे. साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साताऱ्यातील इतर ग्रामपंचायतींचा निकाल काय लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
महाराष्ट्रात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्यानं आज 12 हजार 711 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होत आहे. गावपातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.