मुंबई, 18 जानेवारी: महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात निवडणुकांची धामधूम सुरू होती. आज त्याची सांगता होते आहे. राज्याच्या 34 जिल्ह्यांतल्या 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल आता हाती येत आहेत. सकाळपासून मतमोजणी सुरू आहे आणि हाती आलेल्या कलानुसार, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक चुरस दिसते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास वर्षभराने झालेल्या या गाव पातळीवरच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो यावर राज्याचीच नाही तर देशाची नजर आहे.
या निकालांमध्ये काही अपेक्षित, तर काही अनपेक्षित प्रकार घडले. सातार जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातल्या धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात भलताच प्रकार घडला. तिथल्या मतदारांनी कुठल्याही एका उमेदवाराला निवडून देण्याऐवजी सर्वाधिक मतदान NOTA ला केलं आहे. या दोन्ही जागांसाठी झालेल्या मतदानात ग्रामस्थांनी सर्वाधिक मतं NOTA ला दिली आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा निकाल राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाने NOTA ला सर्वाधिक पसंती मिळाली तर फेरनिवडणूक घ्यायची, असा निर्णय दिला होता. आता तसाच निर्णय घेण्यात आला, तर धनगरवाडीच्या या दोन जागांसाठी पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागतील, अशी चिन्हं आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांच्या कलानुसार भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. त्याखालोखाल शिवसेना आहे आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नंबर लागतो.
दुपारी 2 वाजेपर्यंतचा निकालाचा कल..
भाजप 451
शिवसेना 425
राष्ट्रवादी 300
काँग्रेस 320
मनसे 11
अन्य 616
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat